भाजपाला कोट्यवधींची देणगी, काँग्रेसच्या तुलनेत ५ पट जास्त; NCP ला किती मिळाला पार्टी फंड? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 10:56 AM2021-06-10T10:56:02+5:302021-06-10T10:57:15+5:30
२०१९-२० मध्ये प्रुडेंट इलेक्टोरल फंडच्या माध्यमातून भाजपाला २१७.७५ कोटी रुपये देणगी मिळाली. तर जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्टकडून ४५.९५ कोटी मिळाले आहेत.
नवी दिल्ली – भाजपा(BJP) आणि काँग्रेस(Congress) हे देशातील सर्वात मोठे राजकीय पक्ष आहेत. या दोन्ही पक्षाचा राष्ट्रीय राजकारणातील दबदबा कायम दिसून आला आहे. परंतु पार्टी फंडाचा(Party Fund) विचार केला तर भाजपा सलग ७ वर्ष झाली काँग्रेसच्या खूप पुढे निघून गेली आहे. निवडणूक आयोगाने छापलेल्या रिपोर्टमधून याची आकडेवारी समोर आली आहे.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, २०१९-२० मध्ये भाजपाला कॉर्पोरेट आणि व्यक्तिगत स्वरुपात तब्बल ७८५ कोटी देणगी(Donation) मिळालं आहे. काँग्रेस पक्षाला १३९ कोटी रुपये देणगी मिळाली आहे. याचा अर्थ काँग्रेसच्या ५ पट जास्त भाजपाला देणगी मिळाली आहे. तर याच कालावधीत एनसीपी(NCP) ला ५९ कोटी, टीएमसी(TMC) ८ कोटी, सीपीएम १९.६ कोटी आणि सीपीआय १.९ कोटी रुपये देणगी मिळाली आहे.
भाजपा खासदार राजीव चंद्रशेखर यांच्या ज्युपिटर कॅपिटल, आयटीसी ग्रुप, रियल इस्टेट कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर्स(लोढा) आणि बी.जी शिर्के कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी, प्रूडेंट इलेक्ट्रोल ट्रस्ट आणि जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्ट यांचा भाजपा देणगीदारांच्या यादीत समावेश आहे. २०१९-२० मध्ये प्रुडेंट इलेक्टोरल फंडच्या माध्यमातून भाजपाला २१७.७५ कोटी रुपये देणगी मिळाली. तर जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्टकडून ४५.९५ कोटी मिळाले आहेत.
ज्युपिटर कॅपिटलकडून १५ कोटी, आयटीसी ग्रूप ७६ कोटी. मॅक्रोटेक डेव्हलपर्स २१ कोटी तर गुलमर्ग रियलटर्सकडून २० कोटी मिळाले आहेत. बी.जी शिर्के टेक्नोलॉजीकडून भाजपाला ३५ कोटींची देणगी मिळाली आहे. भाजपाला ऑक्टोबर २०१९ मध्ये बांधकाम व्यावसायिक सुधाकर शेट्टी यांच्या रियल इस्टेट कंपनी गुलमर्ग रियल्टर्सकडून २० कोटी रुपये देणगी मिळाली होती. याची माहिती मिळाल्यानंतर ईडीनं जानेवारी २०२० मध्ये सुधाकर शेट्टी यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर छापा मारला होता.
त्याशिवाय भाजपाला अन्य १४ शिक्षण संस्थांकडून फंड मिळाला आहे. दिल्ली मेवार यूनिवर्सिटी, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग. जीडी गोयंका इंटरनॅशनल स्कूल, सूरत पठानिया पब्लिक स्कूलनेही भाजपाला फंड दिला आहे. भाजपानंतर प्रादेशिक पक्षात सर्वात जास्त देणगी मिळालेला पक्ष म्हणजे टीआरएस आहे. टीआरएसला सर्वाधिक १३०.४६ कोटी देणगी मिळाली. वायएसआरसीपीला ९२ कोटी तर बीजेदला ९०.३५ कोटी मिळाले आहेत.