मुंबई : मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण नाकारणारा ७ मे रोजीचा जीआर रद्द करावा आणि त्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी भेटून केली. तत्पूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित होताच या विषयावर येत्या मंगळवारी बैठक घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून दिवसभर वातावरण तापलेले होते. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत या तीन ज्येष्ठ मंत्र्यांची दुपारी बैठक झाली. त्यानंतर काँग्रेसच्या मंत्र्यांची प्री-कॅबिनेट बैठक झाली. त्यात पदोन्नतीत आरक्षणाचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरण्याची भूमिका ठरली. मंत्रिमंडळ बैठकीत राऊत यांनी हा विषय लावून धरताच उपमुख्यमंत्री व पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांनी हा विषय इथे चर्चेचा नाही, मंगळवारी उपसमितीची बैठक घेऊन ठरवू असे सांगिल्याचे कळते. त्यावर काँग्रेसच्या इतर दोन मंत्र्यांनीही चर्चेचा आग्रह धरला पण चर्चा होऊ शकली नाही.मंत्रिमंडळ बैठकीनंतर बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आणि वर्षा गायकवाड हे तीन मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटले आणि अजित पवार हे पदोन्नतीतील आरक्षणाच्या विरोधात आहेत असा आरोप त्यांनी केल्याचे कळते. या विषयाचा फैसला आपल्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावून करा, कोणत्याही परिस्थितीत ७ मे रोजीचा जीआर रद्द झाला पाहिजे असा आग्रह या मंत्र्यांनी धरला. पदोन्नतीत आरक्षण देण्याऐवजी सर्व १०० टक्के पदोन्नती या सेवाज्येष्ठतेनुसार देण्याचा ७ मे रोजीचा जीआर अन्यायकारक आहे. उच्च न्यायालयाने पदोन्नतीत आरक्षण रद्द केले होते. त्याला राज्य शासनानेच सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले असताना आता शासनच आपल्या भूमिकेला छेद देत आहे याकडे या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले असेही सूत्रांनी सांगितले.
Reservation in promotion: पदोन्नतीतील आरक्षणाचा मुद्दा पेटला; मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा काँग्रेसच्या मंत्र्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 7:53 AM