अतुल कुलकर्णीमुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त जागेवर आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांची तर प्रदेशाध्यक्षपदासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख या नावांची चर्चा आहे. नाना पटोले यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
आक्रमक नेते म्हणून पटोले यांची ओळख आहे. विधानसभाध्यक्षपदामुळे आक्रमकपणाला मुरड घालावी लागत होती. काँग्रेस वाढवायची असेल तर मोठे बदल करावे लागतील यावर पक्षात अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यात पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपद द्यावे, अशी मागणी केल्याचे समजते. प्रत्यक्षात पडद्यामागे वेगळ्या हालचाली घडत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पटोले यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन पाडवी यांना विधानसभेचे अध्यक्षपद द्यायचे असे एक नियोजन आहे. यानिमित्ताने विधानसभेच्या अध्यक्षपदाचा मान आदिवासी समाजाला पहिल्यांदाच दिला जाईल. राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले की, सरकार बनवतेवेळी विधानसभाध्यक्षपद काँग्रेसला देण्याचा एकमताने निर्णय झाला होता, त्यामुळे त्यात बदल होणार नाही.
खल सुरू....पटोले यांना मंत्रिपद आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद द्यायचे, की फक्त मंत्रिपद द्यायचे? यावरदेखील खल सुरू आहे. अमित देशमुख यांना मंत्रिपद आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद द्यावे, अशीही मागणी पुढे आली आहे. अमित देशमुख हे पटोले यांच्या तुलनेने कमी आक्रमक आहेत. तीन पक्षांचे सरकार चालविताना आक्रमकपणा अडचणीचा होऊ शकतो, असा एक सूर पुढे आला आहे. सध्या महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात असे दोन गट आहेत. चव्हाण गटाला अमित देशमुख नको आहेत तर थोरात यांना अमित प्रदेशाध्यक्ष झाले तर चालतील, अशी परिस्थिती आहे.
तिन्ही पक्षांना मान्य नेतामहाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे राहील, अशी असा निर्णय झाला होता. त्यामुळे हे पद कोणाला द्यायचे याचा निर्णय काँग्रेसने घ्यायचा असला, तरी तिन्ही पक्षांना मान्य असेल असे नाव पुढे आणले जाईल. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी होते. पण पाडवी आदिवासी समाजाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाला राष्ट्रवादी आणि शिवसेना विरोध करणार नाही. यानिमित्ताने महाविकास आघाडी सरकारने आदिवासी समाजाच्या नेत्याला विधानसभेचे सर्वोच्च पद दिले, असा संदेशही देता येईल अशी चर्चा आहे.