ठाकरे सरकारमध्ये लवकरच मोठ्या फेरबदलांची शक्यता; दोन मंत्र्यांना डच्चू, एकाला प्रमोशन?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 08:17 PM2021-07-16T20:17:26+5:302021-07-16T20:20:26+5:30
कामगिरी समाधानकारक नसल्यानं लवकरच दोन मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता
नवी दिल्ली/मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाचा जम्बो विस्तार झाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळातही लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. दोन मंत्र्यांना नारळ दिला जाणार असून एका राज्यमंत्र्याला प्रमोशन मिळणार आहे. कामगिरीच्या आधारे हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. सध्या याबद्दल दिल्लीतील काँग्रेसच्या वर्तुळात जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं येत्या काही दिवसांत काँग्रेसकडून याबद्दलचे निर्णय घेतले जातील.
आदिवासी भागातील मंत्री असलेल्या एका नेत्याबद्दल पक्षात पक्षातच नाराजी आहे. या मंत्र्याच्या तक्रारी थेट दिल्लीपर्यंत गेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील या नेत्याला लवकरच नारळ दिला जाऊ शकतो. या मंत्र्याच्या कामाबद्दल तीव्र नाराजी आहे. मंत्री महोदय राष्ट्रवादीच्या अधीन राहून काम करतात की काय, अशी चर्चा त्यांच्याच पक्षात सुरू आहे. त्यामुळे लवकरच त्यांची गच्छंती होऊ शकते. तर मुंबईतील एका मंत्र्यालादेखील डच्चू दिला जाणार आहे. एबीपी माझानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
ग्रामीण भागातील एक आणि मुंबईतील एक अशा दोन मंत्र्यांना काँग्रेसकडून नारळ दिला जाऊ शकतो. कामगिरीच्या निकषावर दिल्लीतून याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. तर एका राज्यमंत्र्याला बढती मिळणार आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकेल. पक्षातील संतुलन विचार घेऊन लवकरच याबद्दलचा निर्णय होईल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे. मात्र काँग्रेस नेतृत्व याबद्दल फारसं अनुकूल नाही. नानांकडे सध्या पक्षवाढीची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी त्यासाठी पूर्णवेळ काम करावं, अशी नेतृत्त्वाची इच्छा आहे.