मोदींबद्दल आदर, पण राजीव गांधींबद्दलच्या विधानांशी असहमत; भाजपा नेत्याकडून घरचा अहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 02:04 PM2019-05-09T14:04:36+5:302019-05-09T14:05:51+5:30
मोदींच्या राजीव गांधींवरील वक्तव्यांशी भाजपाचे वरिष्ठ नेते असहमत
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मनात आदर आहे. पण त्यांच्या माजी पंतप्रधान राजीव गांधींविषयीच्या विधानांबद्दल सहमत नसल्याचं कर्नाटकमधल्या भाजपा नेत्यानं म्हटलं आहे. राजीव गांधींचा मृत्यू भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे झाला नाही, तर लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमनं कट रचून त्यांची हत्या घडवली, असं भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री श्रीनिवास प्रसाद यांनी म्हटलं.
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीव गांधींचा मृत्यू झाला नाही. कोणीही यावर विश्वास ठेवणार नाही. मीदेखील ठेवणार नाही. पंतप्रधान मोदींबद्दल माझ्या मनात आदर आहे. मात्र त्यांना राजीव गांधींविरोधात बोलण्याची आवश्यकता नव्हती, असं प्रसाद म्हणाले. राजीव गांधींनी कमी वयात अतिशय मोठी जबाबदारी पेलली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनीदेखील राजीव गांधींचं कौतुक केलं होतं, असंदेखील प्रसाद यांनी म्हटलं. श्रीनिवास प्रसाद यांनी 24 डिसेंबर 2016 रोजी भाजपात प्रवेश केला.
उत्तर प्रदेशातल्या प्रतापगढमध्ये शनिवारी झालेल्या रॅलीत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना लक्ष्य करताना त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधींवरदेखील टीका केली होती. 'तुमच्या (राहुल गांधींच्या) वडिलांना त्यांच्या राजदरबारातील लोकांनी मोठा गाजावाजा करत मिस्टर क्लीन म्हटलं होतं. मात्र हळूहळू भ्रष्टाचारी नंबर वनच्या रुपात त्यांचं आयुष्य संपलं. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुकीला क्षमा करतो. मात्र फसवणूक करणाऱ्याला कधीही माफ करत नाही,' अशा शब्दांमध्ये मोदींनी राजीव गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली होती. मोदींच्या या टीकेला राहुल यांनी उत्तर दिलं होतं. 'मोदीजी, लढाई संपली आहे. तुमची कर्म तुमची वाट पाहत आहेत. माझ्या वडिलांवर आरोप करुन तुम्ही वाचू शकणार नाही,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.