मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने होळी (Holi 2021) आणि धुलीवंदनाच्या सणावर लादलेल्या निर्बंधांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सार्वजनिक ठिकाणी सण साजरा करण्यावर सरकारने निर्बंध घातल्यामुळे याविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावरून भाजपाचे नेते अतुल भातखळकर, राम कदम यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. (restrictions for holi dhulivandan celebration; bjp leaders atul bhatkhalkar, ram kadam slams thackeray govt)
होळीवर बंदी अन् शब-ए-बारातला परवानगी, हिंदू विरोधी ठाकरे सरकारचा निषेध, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली. तर हिंदू विरोधी ठाकरे सरकार म्हणतंय होळी घराच्या दारासमोर पेटवायची नाही. तर मग काय घरात पेटवायची? असा सवाल राम कदम यांनी केला आहे. त्यामुळे होळी आणि धूलिवंदनाच्या सणावरून पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना आमने-सामने आली आहे.
भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर एक व्हीडिओ शेअर करत यासंदर्भात भाष्य केले आहे. शब-ए-बारातला नियमांसह परवानगी पण होळीच्या सणावर कडक निर्बंध, ठाकरे सरकारच्या या हिंदू विरोधी फतव्याला भारतीय जनता पार्टीचा पूर्ण विरोध असून मुंबईतील हिंदू बांधवांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत आपापल्या श्रद्धेनुसार होळी साजरी करावी, असे आवाहन अतुल भातखळकर यांनी केले.
याचबरोबर, गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे कारण पुढे करत हिंदू सणांवर निर्बंध लादणाऱ्या ठाकरे सरकारने इतर धर्मियांच्या उत्सवांना मात्र खुली सूट दिली आहे. ठाकरे सरकारच्या अशा हिंदू विरोधी कृत्यांचा जाहीर निषेध करून आम्ही होळी साजरी करणारचं, ठाकरे सरकार मध्ये जर हिम्मत असेल तर त्यांनी आमच्यावर कारवाई करून दाखवावी, असे आव्हानही अतुल भातखळकर यांनी दिले.
"महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार आहे की मुस्लिम लीगचं? शब्बे बारातला परवानगी देऊन ठाकरे सरकारनं होळीवर बंदी घातली आहे. हा हिंदू विरोध खपवून घेणार नाही. हिंदूनों जनाब सेनेचा फतवा धाब्यावर बसवा. सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळून होळी दणक्यात साजरी करा. चिल्लर औरंगजेबी मानसिकतेचा धिक्कार," असेही ट्विट करत अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
घरात होळी पेटवायची का?"हिंदू विरोधी ठाकरे सरकार म्हणतंय होळी घराच्या दारासमोर पेटवायची नाही. तर मग काय घरात पेटवायची? लोक रंगपंचमी समजू शकतात गर्दी होईल. एकमेकांना स्पर्श होईल मात्र नियमांचं पालन करत होळी पेटवली आणि हिंदू बांधवांनी आपला सण साजरा केला, तर त्याला ठाकरे सरकारचा विरोध का? अन्य धर्मांना तातडीनं परवानगी दिली जाते ते काय कोविडचे नातेवाईक लागतात की वसुली सरकारचे?", असा सवाल करत भाजपाचे आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
होळीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे नागरिकांना आवाहनमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना होळीनिमित्त आवाहन केले आहे. "परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारं होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणानं साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी व निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन करोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचं काटेकोर पालन करूया", असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. याशिवाय, होळी, धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.