ठाणे - ठाण्यातील ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने शोध मोहीम सुरु केली आणि अचानक त्यांच्या संपत्तीची चर्चाही वाऱ्यासारखी सुरु झाली. डोंबिवली ते ठाणे असा त्यांचा मागील २० ते २५ वर्षाच्या काळात रिक्षा चालक ते १२६ कोटींचे मालक असा त्यांचा हा प्रवास आहे. परंतु या प्रवासात केवळ राजकारणच न करता बांधकाम व्यावसाय, हॉटेल व्यावसाय, हॉस्पिटल, मराठी चित्रपटाची निर्मिती असा त्यांचा हा सारा प्रवास आहे.
मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास सरनाईक यांचं निवासस्थान, कार्यालये आणि विविध १० ठिकाणी ईडीच्या मार्फत ही शोध मोहीम सुरु करण्यात आली. त्यानंतर साडेचार तासानंतर विहंग या त्यांच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. परंतु अचानक ही चौकशी का करण्यात आली कशासाठी यामागे नेमके राजकारण काय असे विविध पैलुंचा उलघडा आता होणे गरजेचे ठरले आहे. परंतु भाजपा विरुध्द उघडलेली मोहीमच त्यांना भारी पडल्याची चर्चा देखील आता सुरु झाली आहे. दरम्यान या निमित्ताने सरनाईक यांच्या प्रवासाची देखील चर्चा सुरु झाली आहे. सरनाईक एवढे कोट्यधीश झाले कसे त्यांच्याकडे एवढी संपत्ती आली कशी अशा चर्चा देखील दिवसभर सुरु होत्या.
सरनाईक यांचा प्रवास डोंबिवलीतून सुरु झाला. ते सुरूवातीच्या काळात या भागात रिक्षा चालवत होते. घरची परिस्थिती देखील त्यांची हालाखीची होती. तर त्यांच्या पत्नीची अंडाबुर्जीची गाडी असल्याचे बोलले जाते. ते तिला या व्यवसायात साथ देत होते. परंतु काही वर्षानी त्यांनी आपला डोंबिवलीतील मुक्काम हलविला आणि ठाण्याच्या दिशेने कुच केली. १७ ते २० वर्षापूर्वी ते ठाण्यात स्थायिक झाले. त्यानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी त्यांची मैत्री जुळली. त्यानंतर त्यांनी हळू हळू राजकारणात प्रवेश केला. राजकारणात प्रवेश करतानाच त्यांनी या ठिकाणी आपला बांधकाम व्यावसायही सुरु केला. टप्याप्याने ते या व्यवसायात स्थिर स्थावर झाले. त्यात महापालिकेत नगरसेवक झाल्यानंतर विरोधी पक्षनेते पदावरुन सरनाईक आणि आव्हाड यांच्यात तू तू मै मै झाली. त्यानंतर त्यांनी आव्हाडांची साथ सोडत थेट शिवसेनेत प्रवेश केला. राजकारण करत असतांनाच त्यांनी आपल्या बांधकाम व्यवसायकडे जराही दुर्लक्ष केले नाही. पुढे ते शिवसेनेच्या तिकीटावर प्रथमच नव्याने निर्माण झालेल्या ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाचे आमदार झाले. आता सलग तीन वेळा ते याच मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
दरम्यान हा राजकीय प्रवास सुरु असतांनाच त्यांनी बांधकाम व्यवसायाबरोबर हॉटेल व्यवसायात उडी घेतली. त्यानुसार वर्तकनगर येथे दोन आणि घोडबंदर भागात त्यांचे विहंग या पुत्रचे नावे हॉटेल्स देखील आहेत. शिवाय हा व्यवसाय सुरु असतांना त्यांनी हॉस्पिटल क्षेत्रातही आपले नशिब आजमावण्यास शिवाय आता त्यांनी स्वत:च्या नावाने इंटरनॅशनल स्कुलही सुरु करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचेही काम घोडबंदर भागात सुरु आहे. शिवाय मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रतही त्यांनी आपले नशीब आजमावले आहे. एकूणच रिक्षा चालवता चालवता त्यांनी टप्याटप्याने आणि आपल्या पत्नीच्या साथीने आज ठाण्यात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
मागील २० ते २५ वर्षापूर्वी ज्यांच्या घरात खाण्याचे वांदे होते, आज त्यांच्याकडेच याच व्यवसायातून ते कोट्यवधीचे मालक झाले आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सरनाईक यांनी निवडणुक आयोगाला सादर केलेल्या सत्यप्रतिज्ञापत्रत त्यांच्याकडे १२६.२९ कोटींची स्थावर आणि जंगम मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये जंगम मालमत्ता २१ कोटी ८९ लाख ६९ हजार १६५ रुपये, तर स्थावर मालमत्ता मध्ये १०४ कोटी ४० लाख १० हजार २०० रुपये, कर्ज ११० कोटी ९६ लाख ५८ हजार १६८, वाहन, सोने चांदी २५ तोळे, पत्नीच्या नावे दोन वाहन ५० तोळे दागिने, गाळा व सदनिका अशी एकूण संपत्ती दाखविली आहे. एकूणच आज एका रिक्षा चालक ते १२६ कोटींचा मालक असा सरनाईक यांचा प्रवास झाला आहे.