पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार सोमवारी संध्याकाळी संपला. पहिल्या टप्प्यात बिहारमधील 16 जिल्ह्यांतील 71 मतदारसंघांमध्ये बुधवारी मतदान होणार आहे. यातील बहुतेक मतदारसंघ हे नक्षलप्रभावित असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील आहेत. याच दरम्यान राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सणसणीत टोला लगावला आहे. "नितीश कुमार हे शारीरीक आणि मानसिकरित्या थकलेले आहेत. त्यामुळे ते माझ्याबाबतीत जे काही बोलतील ते माझ्यासाठी आशीर्वादाप्रमाणेच आहेत" असं म्हणत तेजस्वी यादव यांनी निशाणा साधला आहे.
तेजस्वी यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "नितीश कुमार यांनी माझ्याबाबत कोणतेही अपशब्द उच्चारले तरी माझ्यासाठी तो आशीर्वाद आहे. नितीश कुमार हे शारीरीक आणि मानसिकरित्या थकलेले आहेत. त्यामुळे जे मन करेल किंवा ते काहीही बोलले तरी त्यांची प्रत्येक गोष्ट मी आशीर्वाद म्हणून घेतो. यावेळी बिहारने ठरवलं आहे. रोटी-रोजगार आणि विकासाच्याच मुद्दयावर निवडणुका पार पडणार" असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते नितीश कुमारांवर हल्लाबोल करत आहेत.
'हा प्रश्न तुमच्या आई-वडिलांना विचारा', मुख्यमंत्र्यांचा संयम सुटला; म्हणाले...
नितीश कुमार यांचा एका भाषणादरम्यान संयम सुटला होता. त्यांनी तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. "तुम्हाला संधी होती, तेव्हा एखादे शाळा-महाविद्यालय उभारले का, हा प्रश्न तुमच्या आई-वडिलांना विचारा" असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. बेगुसरायमध्ये विधानसभा निवडणूक प्रचारासाठी शनिवारी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नितीश यांनी असं म्हटलं आहे. "इतरांना सरकार बनविण्याची संधी मिळाली. त्यांनी काय केले? एखादे शाळा-महाविद्यालय बांधले का? आज तुम्हाला शिकायचे आहे, तर सरकार असताना शाळा-महाविद्यालय बांधले का, हा प्रश्न तुमच्या आई-वडिलांना विचारा" असं म्हटलं होतं.
नितीश कुमार यांनी "शिक्षण, आरोग्यव्यवस्था यावर भर देण्याऐवजी 'जंगलराज'वर भर देणाऱ्यांनी नोकरी व विकासावर बोलणे म्हणजे थट्टाच आहे. तुरुंगात जावे लागल्यावर खुर्चीवर पत्नीला आणून बसवले. आपल्या बिहारमध्ये हे होत होते. परंतु, आता माझ्या सरकारमध्ये एखादे चुकीचे कृत्य केले, कायदा मोडला, तर त्याला थेट तुरुंगात जावे लागते" असं देखील म्हटलं आहे. राष्ट्रीय लोकसमता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी "एनडीएचा विजय झाल्यास नितीश कुमार मुख्यमंत्री होणार नाहीत तर बिहारमध्येभाजपाचाच मुख्यमंत्री होईल. नितीश कुमार यांना दिल्लीला पाठवले जाईल" असा दावा केला आहे. तसेच नितीश कुमार आणि भाजपामध्ये डील झाल्याचं देखील कुशवाहा यांनी म्हटलं आहे.
"नितीश कुमार दिल्लीत जाणार, बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री होणार"
"मला वाटतं की भाजपा आणि नितीश कुमार यांच्यामध्ये डील झाली आहे. त्यानुसार नितीश कुमारही मुख्यमंत्रीपदी विराजमान न होण्याबाबत सहमत आहेत. त्यांच्या नावावर अल्पसंख्यांकांची मत घेऊन नितीश कुमार यांना दिल्लीत सेट करुन बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री करायचं, असं त्यांचं ठरलं आहे. मात्र, बिहारचे लोक असं होऊ देणार नाहीत" असं उपेंद्र कुशवाहा यांनी म्हटलं आहे. बिहारमधील नेत्यांनी जनतेला निराश केल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.