पाटणाभाजप आणि जनता दल युनायटेडमध्ये (जदयू) तणाव निर्माण झाल्याचं वातावरण लक्षात घेता राष्ट्रीय जनता दलाने (राजद) राजकीय घाव घालण्याचा प्रयत्न केला आहे.
"नितीश कुमार यांनी एनडीएला सोडचिठ्ठी देऊन तेजस्वी यादव यांना बिहारचं मुख्यमंत्री केलं. तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी नितीश कुमार यांना देशाच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करू", असं विधान राजदचे नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी केलं आहे.
नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री झाले असले तरी भाजपचं राज्यावर अधिकार सांगत असल्याचं स्पष्टपणे दिसतं, असं म्हणत राजद नेत्यांनी जदयू आणि भाजपमध्ये पडलेल्या ठिणगीला फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे.
अरुणाचल प्रदेशमधील जदयूच्या ६ आमदारांना फोडून भाजपने आपल्या गटात सामील करुन घेतलं. त्यानंतर भाजप युतीधर्माचं पालन करत नसल्याचा आरोप करत जदयूने नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे भाजपकडून जदयूच्या नाराजीवर पडदा टाकण्याचं काम केलं जात आहे. राज्यसभा सदस्य आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी जदयूसोबतची युती भक्कम असल्याचं वक्तव्य केलं आणि नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद नको असतानाही त्यांच्याच निवडीसाठी भाजप आग्रही होतं, असं वक्तव्य केलं आहे.
"राज्याचं मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचं वक्तव्य करण्याचा नितीश कुमार यांना वैयक्तिक अधिकार आहे. पण त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी एनडीएची इच्छा होती. ते आधीपासूनच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचे एनडीएचे उमेदवार होते", असं सुशीलकुमार मोदी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
'जदयू'मध्ये 'भाजप'बद्दल खदखद'जदयू'च्या नेत्यांमध्ये भाजपबद्दल खदखद असल्याचा दावा यावेळी उदय नारायण चौधरी यांनी केला. "तुम्ही जदयूच्या कोणत्याही नेत्याला विचारलं की ते सांगतील की चिराग पासवान यांना भाजपने प्रॉक्सीम्हणून निवडणुकीला उभं केलं होतं. त्यांच्यामुळे अनेक ठिकाणी जदयूचे उमेदवार पराभूत झाले. जदयूच्या बैठकीतही याबाबत जाहीररित्या वक्तव्य करण्यात आली आहेत. त्यानंतर आता अरुणाचलमध्ये मिळालेल्या धक्क्यानंतर तरी जदयूचे डोळे उघडतील अशी आशा आहे", असं नारायण चौधरी म्हणाले.