नवी दिल्ली - भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध राष्ट्रीय जनता दल यांच्यातील ‘काँटे की टक्कर’ यामुळे सगळ्या देशाचे लक्ष बिहारकडे लागलेले असले तरी तब्बल 56 जागांवर पोटनिवडणुकीसाठी 11 राज्यांमध्ये मतदान होणार आहे. याच दरम्यान राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. 10 लाख नोकऱ्या देण्याचं आरजेडीचं आश्वासन हे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे असं नितीश कुमार यांनी म्हटलं होतं त्याला आता तेजस्वी यांनी उत्तर दिलं आहे.
10 लाख नोकऱ्यांसाठी 1 लाख 44 हजार कोटींची आवश्यकता आहे. एवढा निधी कुठून आणणार? असा सवाल नितीश कुमार यांनी विचारला आहे. त्यांच्या या प्रश्नावर तेजस्वी यांनी "10 लाख नोकऱ्यांसाठी बजेट कमी पडले तर मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचे पगार कापले जातील" असं म्हणत आता पलटवार केला आहे. "सरकाऱ्याच्या बजेटमधील 80 हजार कोटी रुपये खर्च होत नाहीत. यानंतरही 10 लाख तरुणांना नोकरी उपलब्ध देण्यासाठी निधीची कमतरता असेल तर मुख्यमंत्री, मंत्री आणि सर्व आमदारांचे पगार कापले जातील" असं तेजस्वी यादव य़ांनी म्हटलं आहे.
"सत्तेत आल्यास पाच लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज माफ केले जाईल"
तेजस्वी यांनीही शिक्षण कर्ज माफ करण्याचीही घोषणा केली आहे. सत्तेत आल्यास पाच लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज माफ केले जाईल. याशिवाय दोन नवीन विद्यापीठांची स्थापन करण्याची घोषणा देखील तेजस्वी यादव यांनी केली आहे. बेगुसरायमध्ये राष्ट्रकवी दिनकर आणि मिथिलांचलमध्ये जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या नावावर विद्यापीठ स्थापन केले जाईल असं तेजस्वी यांनी म्हटलं आहे. आरजेडीची आश्वासनं ही जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. अर्थसंकल्पात यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात, असं मुख्यमंत्री नितीश कुमार याआधी म्हणाले आहेत.
"नितीश कुमार हे शारीरीक आणि मानसिकरित्या थकलेले..."; तेजस्वी यादवांचा सणसणीत टोला
10 लाख नोकऱ्या देण्याची भाषा करत आहेत. त्यांच्या 15 वर्षांच्या सरकारच्या कार्यकाळात संयुक्त बिहारमध्ये फक्त 95 हजार नोकर्या देण्यात आल्या होत्या असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना याआधीही सणसणीत टोला लगावला आहे. "नितीश कुमार हे शारीरीक आणि मानसिकरित्या थकलेले आहेत. त्यामुळे ते माझ्याबाबतीत जे काही बोलतील ते माझ्यासाठी आशीर्वादाप्रमाणेच आहेत" असं म्हणत तेजस्वी यादव यांनी निशाणा साधला. तेजस्वी यादव यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. "नितीश कुमार यांनी माझ्याबाबत कोणतेही अपशब्द उच्चारले तरी माझ्यासाठी तो आशीर्वाद आहे. नितीश कुमार हे शारीरीक आणि मानसिकरित्या थकलेले आहेत. त्यामुळे जे मन करेल किंवा ते काहीही बोलले तरी त्यांची प्रत्येक गोष्ट मी आशीर्वाद म्हणून घेतो. यावेळी बिहारने ठरवलं आहे. रोटी-रोजगार आणि विकासाच्याच मुद्दयावर निवडणुका पार पडणार" असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं होतं.
"रोजगारासाठी नाही तर हौस पूर्ण करण्यासाठी बिहारमधील लोक मुंबई-दिल्लीला जातात"
जेडीयूचे आमदार आणि सध्या उमेदवार असलेले शशि भूषण हजारी यांनी बिहारच्या जनतेबद्दल एक विधान केलं असून सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. "रोजगारासाठी नाही तर हौस पूर्ण करण्यासाठी बिहारमधील लोक हे मुंबई-दिल्लीला जातात" असं शशि भूषण हजारी यांनी म्हटलं आहे. "माझ्या मतदारसंघामध्ये दरवर्षी पुराची समस्या असते. मात्र येथील लोक कामाच्या शोधात इतर राज्यामध्ये जात नाहीत" असा दावा हजारी यांनी केला आहे. मात्र बिहारमधील काही ठिकाणचे लोक हे फक्त हौस म्हणून राज्याबाहेर जातात असं हजारी यांनी व्हिडीओमध्ये म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावरून निशाणा साधला आहे. दुसऱ्या राज्यांमध्ये रोजगाराच्या शोधात जाणाऱ्या बिहारी मजुरांऐवढेच पैसे गावातील मजुरांना मिळतात असं देखील त्यांनी म्हटलं आहे.