- एस. पी. सिन्हापाटणा : बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्प अधिवेशनात विधानसभा परिसरात विरोधी पक्षाच्या आमदारांना झालेल्या मारहाणीचा विषय पुन्हा तापत चालला आहे. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार सरकार बरखास्त करण्याची राज्यपालांकडे मागणी केली.आमदारांना मारहाणीच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत व्यवहार किंवा मर्यादेची लक्ष्मणरेषा ओलांडण्याची परवानगी कोणालाही दिली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले.सिन्हा म्हणाले की, आमदारांच्या प्रतिष्ठेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही आणि सभागृहाची अस्मिता सर्वांत मोठी आहे. आमदारांशी गैरवर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना ओळखून त्यांच्यावर कारवाईचे निर्देश आयुक्त तथा पोलीस महानिरीक्षकांना सिन्हा यांनी दिले. याच मुद्द्यावर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांना लिहिलेल्या पत्रात विधानसभा परिसरात आमदारांना बुटांनी मारहाण करणारे दोषी पोलीस अधिकारी आणि जवानांंवर कारवाई करावी, अशी मागणी केली. तेजस्वी यादव यांनी पत्रात लिहिले की, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर ज्या प्रकारे सभागृहात विरोधी सदस्यांना क्रूरपणे मारहाण करून ‘बिहार विशेष सशस्त्र पोलीस विधेयक २०२१’ ज्या प्रकारे संमत केले गेले ते लोकशाहीला घातक आहे. राज्यपालांना पत्र लिहून त्यांनी सरकार बरखास्त करावे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी केली.नितीशकुमारांनी घेतला चिराग यांचा बदलालोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि संसद सदस्य चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयू व मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लक्ष्य केले होते. निवडणुकीच्या सहा महिन्यांनंतर अखेर नितीशकुमार यांनी चिराग यांचा बदला घेतला आहे.एलजेपीचे एकमेव आमदार राजकुमार सिंह यांना जेडीयूत दाखल करून घेतले आहे. राजकुमार सिंह हे मटिहानीचे आमदार आहेत. पक्षाच्या महासचिवांकडून कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर ते नाराज होते. त्यातूनच त्यांनी जेडीयूत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. बिहारमधील विधानसभा निवडणुकीत पासवान यांच्या लोजपाने जेडीयूच्या व्होट बँकेला मोठा हादरा दिला. जेडीयूचे मोठे नुकसान झाले. त्यामुळेचे जेडीयू केवळ ४३ जागा जिंकू शकला.या निवडणुकीत सर्वाधिक ७५ जागा राजदने जिंकल्या. भाजपने ७४, तर लोजपाने एक जागा जिंकली. राजकुमार सिंह म्हणाले की, हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता.
नितीशकुमार सरकार बरखास्त करा -तेजस्वी यादव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 6:17 AM