पाटणा : राजदच्या नेतृत्वातील महाआघाडीने (महागठबंधन) सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या शपथविधीवर बहिष्कार घातला. या निवडणुकीतील जनादेश रालाेआच्या विरोधात होता. बनावट मार्गाचा अवलंब करून तो बदलविण्यात आल्याचा आरोपही महाआघाडीने केला आहे. राजदसह काँग्रेस, भाकप (माले), भाकप, माकप यांचा महाआघाडीत समावेश आहे. नितीशकुमार यांनी राजभवनात सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
हे कठपुतळी सरकार आहे. राज्यकर्त्यांनी जनादेश बदलवून टाकला आहे, असे ट्विट राजदने केले आहे. बेरोजगार युवक, शेतकरी, कंत्राटी कामगार आणि शिक्षकांनी आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत, असा सवाल केला आहे. रालोआच्या बनवेगिरीमुळे लोक संतप्त आहेत. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि लोकांच्या बाजूने उभे आहोत, असेही ट्विटमध्ये म्हटले आहे.
राजदने ७५ जागा पटकावत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला आहे. दोन असहाय पक्षाच्या मदतीने स्थापन झालेले हे असहाय सरकार आहे. मुख्यमंत्री कमकुवत, आळशी आणि भ्रष्ट आहेत. ज्येष्ठ पक्ष असलेल्या भाजपकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाही. बहुमतात येण्यासाठी या पक्षाने बनावट मार्गाचा अवलंब केला आहे. जनतेने राजदला पाठिंबा दिलेला आहे. तेजस्वी यादव हे बिहारमधील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत, असेही ट्विुटमध्ये नमूद आहे.
या शपथविधीवर आम्ही बहिष्कार घातला आहे. आम्हाला शपथविधीचे निमंत्रण मिळालेले नाही. मिळाले तरी मी किंवा माझ्या पक्षाचे कुणी सहभागी होणार नाही.- मदनमोहन झा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष.
आम्ही रालोआविरुद्ध लढत देत आहोत. त्यामुळे शपथविधीत सहभागी होऊ शकत नाही. भाकप आणि माकप या मुद्याबाबतही महाआघाडीसोबत असेल.- कुणाल, राज्य सचिव भाकप (माले).