पटना – बिहारच्या महाआघाडीत सहभागी असलेल्या काँग्रेस आणि आरजेडी यांच्यातील विसंवाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारीवरुन या दोन्ही पक्षात वाद झाला आहे. हा वाद इतका टोकाला गेला की आरजेडी काँग्रेसची खिल्ली उडवली. MLC निवडणुकीतील जागा हा काय सत्यनारायणाचा महाप्रसाद नाही, सर्वांना वाटायला. अशा शब्दात RJD ने काँग्रेसची खिल्ली उडवली आहे.
आरजेडी प्रवक्ते मृत्यूंजय तिवारी यांनी काँग्रेस मागत असलेल्या MLC च्या ७ जागांवर हे विधान केले आहे. ते म्हणाले की, २४ जागांवर आपला विजय व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मग ७ जागांसाठी ते चिंतेत का आहेत. २४ जागांवर आपल्याला चर्चा करायला हवी. परंतु आधी निवडणुकीची घोषणा होऊ द्या. त्यानंतर उमेदवार आणि जागा निश्चित केल्या जातील. निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर महाआघाडीचे पक्ष बसतील आणि त्यावर चर्चा होईल असं त्यांनी सांगितले.
तसेच बिहारच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने वेगळी भूमिका घेत निवडणूक लढवली होती. त्यामुळे MLC निवडणुकीत काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल. तर हैदराबादमध्ये तेजस्वी केसीआरची भेट घेत काँग्रेसला त्यांची जागा दाखवून देत आहेत. त्यावर मृत्यूजय तिवारी यांनी काँग्रेस आमचा जुना मित्र आहे. त्यामुळे लायकी दाखवण्याची गोष्ट येत नाही. आधी निवडणुकीच्या तारखा घोषित होऊ द्या त्यानंतर जागा वाटपावर योग्य ती चर्चा केली जाईल असं आरजेडी म्हणाली आहे.
विधान परिषदेच्या २४ जागांसाठी निवडणूक
बिहारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २४ विधान परिषद जागांसाठी निवडणूक होणार आहे. २०२१ मध्ये कोरोनामुळे पंचायत निवडणुका उशीरा झाल्या. त्यामुळे या कोट्यातून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकाही लांबणीवर पडल्या होत्या. आता बिहारमध्ये पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला सूचित केले आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. तत्पूर्वी बिहारच्या २४ विधान परिषदेच्या जागेवरुन महाआघाडीत दावे प्रतिदावे सुरु झाले आहेत.