मुंबई: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यानंतर आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच आता राष्ट्रवादीकडून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे थेट गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याबाबत तक्रार करण्यात आली असून, यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. (rohit pawar complaint to pm modi and jp nadda about gopichand padalkar statement on sharad pawar)
शरद पवारांवर केलेल्या विधानानंतर गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पडळकर यांनी रोहित पवारांचा फोटो ट्विटरवरून शेअर केला होता. मात्र, आता रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावरून थेट पंतप्रधान मोदी आणि जेपी नड्डा यांच्याकडे तक्रार केली आहे.
“प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला, पण...”; पवारांचा फोटो ट्विट करत पडळकरांचा सूचक इशारा!
विरोधकांनाही मान देण्याची राजकीय संस्कृती महाराष्ट्रात
महाराष्ट्रात विरोधकांनाही मान देण्याची स्वतंत्र राजकीय संस्कृती आहे. आणि आजवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ती संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. पण राज्यात भाजपचे एक ‘महान नेते’ पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर टीका करताना खालच्या पातळीवर पोहोचले आहेत. आपल्याकडे स्त्रीला देवी मानून तिची उपासना करण्याची संस्कृती आहे. पण त्या ‘थोर’ नेत्याने वक्तव्य करताना महिलांचाही अनादर केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे राज्यातील अन्य कोणत्याही भाजप नेत्याने त्यांना फटकारले नाही, किंवा त्यावर भाष्यही केले नाही. राज्याच्या संस्कृती हे शोभा देणारे नाही. पण माझ्यासारख्या नवीन पिढीला अशी भीती वाटते की अशा ‘महान’ नेत्याने केलेल्या वाईट विधानांमुळे राज्यातील राजकीय संस्कृती खराब होईल. आम्ही हे होऊ देणार नाही, परंतु आपल्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनीही योग्य पावले उचलली पाहिजेत, ही आमची अपेक्षा आणि विनंती आहे, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. यामध्ये नरेंद्र मोदी आणि जेपी नड्डा यांना टॅगही करण्यात आले आहे.
प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला
प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला, या शब्दांत गोपीचंद पडळकर यांनी या दगडफेकीचं वर्णन केले आहे. पण अश्या भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता ना आज दबला आहे ना उद्याही दबेल... घोंगडी बैठका सुरूच राहणार..., असा निर्धार गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवरून व्यक्त केला आहे. मात्र, या ट्विटसह राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि एका कार्यकर्त्याचा फोटो पडळकर यांनी ट्विट केला.
“तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही”; राणेंचा थेट इशारा
दरम्यान, शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत असे मी मानत नाही, तुम्ही कोणी तसे मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. शरद पवार हे गेल्या ३० वर्षांपासूनचे भावी पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या भावी पंतप्रधान पदासाठी माझ्या शुभेच्छा. दिल्लीतील राजकारण मला कळत नाही. पण काही कोंबडे दिल्लीत एकत्र आले होते. मात्र, 'रात्र गेली हिशेबात पोरगं नाही नशीबात, अशी यांची परिस्थिती झाली आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले होते.