पुणे : पार्थ पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी आमदारकी लढवण्याची इच्छा प्रकट केली आहे. मात्र त्यासाठी कोणत्या मतदारसंघाची निवड करणार याबाबत त्यांनी मौन पाळणे पसंत केले. त्यामुळे पवारांच्या तिसरी पिढीही राजकारणात रस घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या रोहित पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्ह्णून काम करतअसून त्यांनी आगामी विधानसभा लढविण्याचे संकेत दिले आहे. मात्र याबाबत पक्षातील ज्येष्ठ नेते निर्णय घेतील असे सांगत त्यांनी थेट अध्यक्ष शरद पवार यांच्या कोर्टात चेंडू टोलवला आहे. आता पवार यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष राहणार आहे.
अजित पवार यांचे पुत्र असलेल्या पार्थ यांच्यासाठी स्वतः शरद पवार यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयावर रोहित यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. यावेळी रोहित यांच्या फेसबुकपोस्टने राजकीय विश्वात खळबळ उडाली होती. आता खुद्द रोहित यांनीच स्वतःकरिता उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याने त्यावर काय प्रतिक्रिया उमटतात हे बघणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या तरी त्यांच्या मनात नगर जिल्ह्यातील जामखेड मतदारसंघ असून तिथे त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने काम सुरु केल्याचे समजते. आता त्यांच्या या भूमिकेवर शरद पवार काय प्रतिक्रिया देतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.