अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 09:16 PM2024-10-22T21:16:56+5:302024-10-22T21:18:32+5:30
Rohit Pawar Umesh Patil: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याच्या मार्गावर आहेत. पण त्यांना रोहित पवारांनी विरोध केला आहे.
Umesh Patil Rohit Pawar: अजित पवारांनी जाहीर सभेत पाणउतारा केल्याने नाराज झालेले पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता आहे. उमेश पाटील यांनी मंगळवारी शरद पवारांच्या गाडीतून प्रवास केला. त्यामुळे या चर्चेला आणखी बळ मिळाले. दरम्यान, त्यांना पक्षात घेण्यास आमदार रोहित पवार यांनी मात्र विरोध केला आहे.
रोहित पवारांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उमेश पाटील यांच्या पक्षप्रवेशाबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
रोहित पवार म्हणाले, "शेवटी प्रवेश कोणाचा घ्यायचा? कधी घ्यायचा? पक्षश्रेष्ठींचा तो विषय आहे. पण, कार्यकर्ता म्हणून मला जर तुम्ही बोललात. विचारलं, तर...", असं म्हणत रोहित पवारांनी उमेश पाटलांच्या प्रवेशाला विरोध असण्याची भूमिका स्पष्ट केली.
रोहित पवारांचा उमेश पाटील यांच्या प्रवेशाला विरोध का?
रोहित पवार म्हणाले, "शरद पवारांबद्दल आणि सुप्रिया सुळेंबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन उमेश पाटील बोललेले आहेत. अशा प्रकारचा प्रवेश जर होत असेल, तर मी कार्यकर्ता म्हणून आणि आमच्यात लोकशाही मानसन्मान आहे. पवार साहेब नक्कीच आमच्या भूमिकेवर, नाहीतर आमच्या म्हणण्याला तिथं तेवढंच वजन देतील", असे ते म्हणाले.
"मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. उमेश पाटलांचा जर प्रवेश होत असेल, तर आम्ही कार्यकर्ता म्हणून... नाहीतर कार्यकर्त्यांबरोबर हा कार्यकर्ता म्हणून त्याला पाठिंबा देत नाही. त्याचा विरोध आम्ही पदाधिकारी म्हणून दर्शवू आमच्या नेत्यांसमोर", असे रोहित पवार म्हणाले.