- शेफाली परब-पंडितमोदी लाटेमुळे २०१४ मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघावर भगवा फडकला. दोन वेळा खासदार आणि केंद्रात मंत्रिपद भूषविणारे मिलिंद देवरा यांच्यासाठी हा मोठा झटका होता. विधानसभा आणि महापालिका निवडणुकीतही मुंबईत काँग्रेसची पीछेहाट झाल्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक संजय निरुपम यांच्याऐवजी देवरा यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा निर्णय काँग्रेसने ऐन निवडणुकीच्या तोंडावर घेतला. ही प्रतिष्ठेची लढत जिंकण्यासाठी काँग्रेस पक्ष ताकदीनिशी उतरला आहे. दक्षिण मुंबईत उच्चभूंना मतदानासाठी उतरविण्याचे आव्हान पेलताना बहुभाषक मतदारांचा कौल मिळविण्यासाठी काँग्रेसने जोर लावल्याने ही लढत चुरशीची होईल. काँग्रेसच्या खास करून देवरा कुटुंबाच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारून तेथील विजयामुळे जायंट किलर ठरलेल्या अरविंद सावंत यांना यंदा जोरदार आव्हान पेलावे लागणार आहे. भाजपशी पुन्हा सूर जुळल्यामुळे शिवसेनेला यंदाही यश मिळेल, अशी खात्री आहे. मात्र, ‘शिवसेनेचा उमेदवार तुमचा नाही,’ असा प्रचार भाजपला पाठिंबा देणाऱ्या मतदारांत प्रतिस्पर्ध्यांकडून सुरू आहे नि भाजपच्या पाठबळावरच शिवसेनेच्या यशाचे गणित अवलंबून आहे. इमारतींचा पुनर्विकास, जुन्या चाळींचे प्रश्न, उच्चभ्रू मतदारांतील प्रतिमा हे मुद्दे येथे महत्त्वाचे ठरत आहेत.>युतीचे आव्हान वाटते का?मुळीच नाही, शिवसेनेचा मुखवटा गळून पडला आहे. काही दिवसांपूर्वी ‘चौकीदार चोर है’ म्हणणारे शिवसेनेचे नेते आता ‘मैं भी चौकीदार’ म्हणू लागले आहेत. त्यांचा संधीसाधूपणा मतदारांपुढे आला आहे. या दुटप्पी धोरणामुळे येथील मराठी माणसांतही शिवसेनेविषयी प्रचंड नाराजी आहे. याचे परिणाम निवडणुकीत दिसतील. त्यामुळे यंदा युती हे अजिबात आव्हान नाही.>गुजराती-मारवाडी समाजाच्या मतांवर शिवसेना दावा करते आहे?शिवसेनेच्या धोरणांमुळे दक्षिण मुंबईतील गुजराती- मारवाडी समाज कधीच त्या पक्षाला मतदान करीत नव्हता. यापुढेही करणारही नाही. शिवसेनेचा उमेदवार त्यांचे प्रश्न सोडवू शकत नाही, याची त्यांना जाणीव आहे. मी सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे.>पराभवानंतरची पाच वर्षे तुम्ही मतदारसंघात कुठेच नव्हता, असा आरोप शिवसेनेकडून होत आहे, त्याबद्दल तुमचे मत काय?गेली १५ वर्षे मी दक्षिण मुंबईत काम करतो आहे. २००४ ते २०१४ या काळात खासदार असताना आणि पराभवानंतरही गेली पाच वर्षे माझे काम थांबलेले नाही. उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न, मुंबई पोर्ट ट्रस्ट, बीडीडी आणि बीआयटी चाळींच्या पुनर्विकासाचा मी सातत्याने पाठपुरावा केला. तेव्हा येथील खासदार कुठे होते? गेल्या पाच वर्षांत त्यांनी येथील जनतेचे प्रश्न का नाही सोडविले?भाजपकडून सहकार्य मिळतेय का?गेली २५ वर्षे शिवसेनेची भाजपशी युती होती. मध्यंतरीच्या काळात वैचारिक मतभेद होते. मात्र, आता तेही संपले आहेत. विकास हेच आमचे ध्येय असल्याने भाजपकडून पूर्ण सहकार्य मिळते आहे. कुठेही मतभेद अथवा नाराजी उरलेली नाही. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित काम करीत आहेत. त्यामुळे यंदाही येथे युतीचा झेंडा फडकेल, यात शंका नाही.>गुजराती-मारवाडी मतांकडे काँग्रेसने मोर्चा वळवलाय?गुजराती, मारवाडी हे हिंंदू मतदार आहेत, तसेच ते भाजपचे पारंपरिक मतदार आहेत. त्यामुळे काँग्रेसने कितीही उड्या मारल्या, तरी त्याचा काही उपयोग नाही. उलट आम्ही यावेळी मुस्लीम मतेही मिळवू. काँग्रेसने कितीही प्रचार केला, मतदारांना प्रलोभने दाखविली, तरी ही बहुभाषक मते आम्हालाच मिळतील.>तुम्ही काही कामे केली नाहीत, असा आरोप काँग्रेसकडून होतो आहे? काँग्रेसकडे आता बोलण्यासारखे काहीच उरलेले नाही. माझ्या कार्यकाळात मुंबईतील महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडचे काम सुरू झाले. बीडीडी चाळीच्या विकासाचा प्रश्न मार्गी लागला. मतदारसंघात ६१ कोटींचा निधी मी आणला. या निधीच्या माध्यमातून प्रसाधनगृह, रस्ते डांबरीकरण अशा कामांबरोबरच अत्याधुनिक कार्डिअॅक रुग्णवाहिका जे. जे. रुग्णालयाला देण्यात आली. अशी खूप कामे मी केली आहेत.
बहुभाषक मतदारांची भूमिका महत्त्वाची, उच्चभ्रूंच्या मतदानावर ठरणार गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 5:27 AM