पाटणा - बिहार विधानसभेमध्ये आज दारूवरून तुफान राडा पाहायला मिळाला. मुझफ्फरपूर येथे शाळेत सापडलेल्या अवैध दारू प्रकरणी सभागृहामध्ये विरोधी पक्ष असलेल्या आरजेडीने आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच महसूलमंत्री रामसुरत राय यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. धक्काबुक्की, शिविगाळ सुरू झाली. तसेच एकमेकांना पाहून घेण्याच्या धमक्याही दिल्या गेल्या. (Ruckus ensued in Bihar Assembly over recovery of illicit liquor, Ruling and opposition MLAs clashed )
मुझफ्फरपूरमध्ये रामसुरत राज यांच्या भावाकडून चालवण्यात येत असलेल्या शाळेमधून अवैध दारू जप्त करण्यात आल्याच्या प्रकरणावरून महसूलमंत्री रामसूरत राय यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाने लावून घरली होती. मुद्दा तापलेला असतानाच आरोग्य विभागाच्या बजेटवरील चर्चेदरम्यान, तेजस्वी यादव यांनी पुन्हा एकदा दारुबंदीवर बोलण्यास सुरुवात केली. त्यावरून आरोप प्रत्यारोपांस सुरुवात झाली. तेव्हा विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक असते तर उपमुख्यमंत्रिपद हे घटनात्मक नसते असा टोला तेजस्वी यादव यांनी लगावला, त्यावरून सत्ताधारी पक्षांचे आमदार अधिकच संतप्त झाले.
तेजस्वी यादव यांच्या विधानाला भाजपा आमदारा संजय सरावगी आणि मंत्री जनक राम यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर तेजस्वी यादव यांचा मोठे भाऊ तेजप्रताप सत्ताधारी आमदारांकडे अंगुलीनिर्देश करत काही बोलले. त्यावरून सत्ताधारी अधिकच संतप्त झाले आणि दोन्हीकडचे आमदार आमने-सामने आले. तसेच शिविगाळ करत धक्काबुक्की करू लागले. यादरम्यान, मी तोंड उघडताच सत्ताधारी पक्षाला कापरे भरते, असा टोला लगावला. त्यामुळे वाद अधिकच चिघळला. अखेरीस मार्शलना पाचारण करून आमदारांना बाजूला करावे लागले.
या प्रकारानंतर विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले. कामकाज स्थगित केल्यानंतरही सभागृहामध्ये विरोधी पक्षांकडून घोषणाबाजी सुरूच होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आज विधानसभेत जे काही घडले ते घडता कामा नये होते, असे स्पष्ट आणि कठोर शब्दात सांगितले.