कोलकाता – पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोलकाता येथे पोहचले आहेत. याच दरम्यान भारतीय जनता पार्टीचे महासचिव आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी दावा केला आहे की, विरोधी पक्षाचे शेकडो कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आहेत. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे.
कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, मोदिनीपूरमध्ये होणाऱ्या अमित शहा यांच्या रॅलीमध्ये तृणमुल काँग्रेस, सीपीएम, सीपीआय आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपात प्रवेश होईल, टीएमसीचे मातब्बर नेते सुवेंदु अधिकारी, आमदार शीलभद्र दत्ता, बनश्री मैती पार्टी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तर आमदार मिहिर गोस्वामी यांनी आधीच भाजपात प्रवेश घेतला आहे.
आमच्याकडे यादी नाही परंतु हजारोंच्या संख्येने नेते, कार्यकर्ते भाजपात प्रवेश करतील, यात जिल्हास्तरीयपासून पंचायतस्तरीयपर्यंत कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पुढील काळात भाजपाचं सरकार पश्चिम बंगालमध्ये येणार याचा विश्वास असल्याने हे सर्व भाजपात प्रवेश करत आहेत. मात्र कोणाला पक्षात घ्यायचं हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय असेल असंही कैलाश विजयवर्गीय म्हणाले.
टीएमसीच्या अन्यायकारक सरकार आणि पक्षाच्या मनमानी नेतृत्वामुळे नेत्यांना मजबुरीने पक्षाला रामराम करावा लागत आहे. तर सत्ताधारी पक्षाकडून प्रशासनाचा गैरवापर करण्यात येत असून आयएएस आणि आयपीएस अधिकारी पक्षपातीपणे काम करत आहेत असा आरोप करण्यात आला आहे. एकीकडे टीएमसीचे नेते भाजपात सहभागी होत आहेत, तर दुसरीकडे भाजपा बाहेरच्या नेत्यांना घेण्यावरून मतभेद निर्माण होत असल्याचं चित्र आहे. टीएमसीचे नेते जितेंद्र तिवारी यांना भाजपात सहभागी करण्यावरून केंद्र सरकारमधील मंत्री बाबुल सुप्रियो यांनी सांगितले की, टीएमसीच्या अशा नेत्यांना भारतीय जनता पार्टीत घ्यायला नको
गेल्या 48 तासांत 9 आमदारांनी ठोकला रामराम
शुक्रवारी आणखी एका तृणमूल काँग्रेसच्या आमदाराने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बंगाल कांथी मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार बनसरी मैती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, आज सकाळी पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे सरचिटणीस कबीरुल इस्लाम यांनीही आपला राजीनामा दिला आहे. गेल्या 48 तासांत 9 आमदारांनी राजीनामा दिला आहे. बनसरी मैती हे भाजपामध्ये जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधी जानेवारी 2021 पर्यंत 60-65 आमदार सत्ताधारी तृणमूल काँग्रेस सोडतील, असे राज्यातील भाजपाचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांनी म्हटले होते.