मुंबई : राज्यात सध्या वाढीव वीज बिलांवरून राजकारण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने वाढीव वीज बिल कमी करावे किंवा माफ करावे यासाठी भाजपा आणि मनसे मैदानात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी वीज बिलात सवलत मिळाली पाहिजे, अशी मागणी करत भाजपाने राज्यभर आंदोलनही केले. दरम्यान, याच आंदोलनावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे.
“मोदी सरकारने आर्थिक व्होल्टेज कमी करुन सगळा लोड राज्यावर टाकला आहे. पण मविआ सरकारने वीजबिले कमी करावी यासाठी इलेक्ट्रीक करंट अंगातून गेल्याप्रमाणे नाचणारे भाजप नेते यावर वीज अवरोधक स्लीपर घालून गप्प बसतात. या दांभिक भाजपकडे लक्ष न देता जनतेला दिलासा कसा द्यायचा ते आम्ही पाहू”, असे ट्विट करत सचिन सावंत यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
याआधी “वीज बिलात सवलत मिळाली पाहिजे ही काँग्रेसचीही भावना आहे. परंतु केंद्र सरकार जनतेची दररोज लूट करत आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे भाव कमी असताना देशात इंधनाचे दर वाढवून केंद्र सरकार जनतेची लूट करत आहे. वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन करणाऱ्यांनी या लुटमारी विरोधातही आंदोलन करावे.” असं म्हणत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात घरगुती ग्राहक आणि कार्यालयांना वाढील वीज बिले आली होती. यावरुन गदारोळ निर्माण झाल्यानंतर वाढीव वीज बिलांमध्ये सवलत दिली जाईल, अशी भूमिका सुरुवातीला राज्य सरकारने घेतली होती. मात्र, त्यानंतर काहीही ठोस हालचाली घडताना दिसून आल्या नाही. मात्र, राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिले ग्राहकांनी भरलीच पाहिजे, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारने यू-टर्न घेतला आहे. त्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली.