मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती, या घटनेने पोलीस खात्यात खळबळ उडाली, परंतु या प्रकरणात विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तपास अधिकारी सचिन वाझे यांच्यावर शंका उपस्थित केली, ज्यावेळी ही स्फोटकांनी भरलेली गाडी तिथे आढळली, तेव्हा स्थानिक पोलिसांच्या आधी सचिन वाझे त्याठिकाणी कसे पोहचले? आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास सरकारने सचिन वाझेंनाच दिला असं त्यांनी सांगितलं होतं.(BJP Ashish Shelar Target Mahavikas Aghadi Government over Sachin Vaze Case)
या प्रकरणात काही दिवसांनी जी स्कॉर्पिओ गाडी अंबानींच्या घराबाहेर सापडली, तिचा मालक मनसुख हिरेन यांचा(Mansukh Hiren Death) मृतदेह मुंब्रा येथील रेती बंदर खाडीत आढळला, या मृत्यूमुळे या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं. विरोधकांनी NIA ची मागणी केल्यानंतर सध्या या प्रकरणात NIA तपास करत आहे, त्यात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत, सचिन वाझे यांनाही NIA ने अटक केली आहे. या प्रकरणावरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. शेलार म्हणाले की, पोलिस अधिकाऱ्याच्या गाडीत लाखोंच्या नोटा आणि नोटा मोजायची मशीन सापडली...! एक वर्ष जनता ज्याचा शोध घेत होती तो तिघाडीचा "किमान समान कार्यक्रम" हाच का तो? असा टोला त्यांनी लगावला आहे.
काय आहे प्रकरण?
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक गाडीच्या गुन्ह्याचा तपास करताना सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्याकडून ‘एनआयए’च्या(NIA) पथकाने एक मर्सिडीज जप्त केली आहे. त्याच्या डिक्कीमध्ये एका पिशवीत चेक्सचा शर्ट, पाच लाखांची रोकड, नोटा मोजणारे मशीन, नंबरप्लेट व डायरी सापडली आहे. ही गाडी वाझे वापरीत होते, त्याचप्रमाणे जी नंबरप्लेट आहे, ती स्कॉर्पिओला वापरण्यात आली होती. पीपीई किट वापरणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर असाच लाल रंगाचा चेक्स शर्ट असल्याचे फुटेजमधून स्पष्ट दिसत होते.
त्याचबरोबर जिलेटिनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओमध्ये जी नंबरप्लेट वापरली होती, ती त्यामध्ये सापडली आहे. या गाडीचा वापर वाझे करीत होते. त्यांनी ती कोठून घेतली, त्याचा वापर ते कशासाठी करीत होते, याबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे महानिरीक्षक शुक्ला यांनी सांगितले. दरम्यान, ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांनी संशयास्पद मृत्यूपूर्वी याच गाडीतून प्रवास केला होता, असे समजते.