मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानासमोर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यापासून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची कोंडी झाली आहे. या प्रकरणात सचिन वाझे (Sachin Vaze) यांना राज्य सरकार पाठीशी घातल होते, असा आरोप करत विरोधक ठाकरे सरकारविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. तर आता सचिन वाझे आणि अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचे कनेक्शन हे मातोश्रीवर असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. (''Connection of explosives found near Mukesh Ambani's house In Matoshri '' Navneet Rana makes serious allegations against CM Uddhav Thackeray)
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आहेत. त्या म्हणाल्या की, सचिन वाझे प्रकरण आणि मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचे धागेदोरे मातोश्रीवर आहेत. मुंबई पोलीस का दबावात होते, कुणाच्या दबावात होते. तपास योग्य पद्धतीने का होत नव्हता. याचा शोध घेतला तर या सर्वांच्या तारा मातोश्रीवर जुळलेल्या दिसून येतील. मातोश्राच्या कनेक्शनसोबत याचे कनेक्शन काही ना काही आहे. हे स्पष्टपणे लोकांना दिसून येत आहे. एनआयएच्या माध्यमातून ते स्पष्टपणे समोर येत आहे. आता लवकरच या प्रकरणात दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होईल, असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.
दरम्यान, सचिन वाझे प्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येत असून, त्याबरोबरच महाविकास आघाडी सरकारच्या अडचणींमध्येही भर पडत आहे. या वादामुळे सरकारवर ओढवलेल्या नामुष्कीमधून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यासह राज्य सरकारमधील बड्या नेत्यांच्या वारंवार बैठका होत आहे.
या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाईल, असा चर्चा काल राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने भक्कमपणे अनिल देशमुख यांच्या मागे उभे राहत, त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.