मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या (BJP) नेत्यांमधील वाकयुद्ध कमालीचे तीव्र झालेले आहे. त्यातच सध्या गाजत असलेल्या सचिन वाझे प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपाचे नेते आमनेसामने आले आहेत. सचिन वाझे (Sachin Vaze) यांचा प्रामाणिक पोलीस अधिकारी असा उल्लेख करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी घणाघाती टीका केली आहे. ("Sachin Vaze honest, Kem Cho Worli means Marathi Bana, night life means ..." BJP leader Atul Bhatkhalkar told Sanjay Raut's dictionary)
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत संजय राऊत यांचा शब्दकोषच मांडला आहे. या ट्विटमध्ये भातखळकर म्हणतात की, सचिन वाझे हे प्रामाणिक, ओवेसीसोबत युती म्हणजे हिंदुत्व, केम छो वरळी म्हणजे मराठी बाणा, नाइटलाईफ म्हणजे संस्कृती आणि हरामखोर म्हणजे नॉटी, अर्थात संजय राऊत शब्दकोश, असा चिमटा भातखळकर यांनी काढला आहे.
दरम्यान, सचिन वाझे यांच्या अटकेवरून संजय राऊत यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. "केंद्रीय यंत्रणेला राज्यात घुसवून मुंबई पोलिसांचं खच्चीकरण करण्याचा, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
संजय राऊत म्हणाले होते की, "मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर हा हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. मुंबई पोलिसांची क्षमता जगाला माहिती आहे. मुंबई पोलीस कोणाच्याही दबावाखाली येत नाहीत पण राज्यात घुसायचं, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करायचा, केंद्राचा दबाव आणि दहशत आहे हे दाखवायचं अशा पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे. हे सगळं राजकारण सुरू आहे. सचिन वाझेंना अटक झाली आहे. योग्य ती प्रक्रिया सुरू होईल. यावर मी बोलणार नाही. आरोप ठेवणं आणि प्रत्यक्षात आरोप सिद्ध होणं यामध्ये खूप मोठं अंतर आहे. या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली आहे" असे त्यांनी म्हटले होते.