मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे, राज्यात सुरु असलेल्या सचिन वाझे प्रकरणामुळे ठाकरे सरकारची बदनामी होत आहे, दुपारी १२ च्या सुमारास शरद पवार वर्षावर पोहचले होते, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांची गाडी आणि या प्रकरणात पोलीस सचिन वाझे यांना NIA ने अटक केली आहे, त्यामुळे या मुद्द्यावरून शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं कळतंय.(NCP Chief Sharad Pawar Meet CM Uddhav Thackeray over Sachin Vaze Case)
वर्षा निवासस्थानी अर्धा ते पाऊण तास शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चर्चा झाली, शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक म्हणून काम करतात, सचिन वाझे प्रकरणानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे, यातच विरोधकांनी सचिन वाझे प्रकरणात आक्रमकपणे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत, यातच NIA ने सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनलं आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांना हटवण्याची राष्ट्रवादीची मागणी?
मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पदावरून हटवावं अशीही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचं सांगितलं जात आहे. पवार-ठाकरे भेट दोन दिवसांपासून अपेक्षित होती, परंतु शरद पवार बारामतीला गेल्याने ही भेट आज घडली, या संपूर्ण प्रकरणाने महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे, मुंबई पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वाकारावी. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी(Mukesh Ambani Bomb Scare) आढळणं आणि या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक होणं, त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत, मुंबई पोलीस दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांना हटवण्याची राष्ट्रवादीची आग्रही मागणी आहे असं वृत्त टीव्ही ९ ने दिलं आहे.
आयुक्तांना हटवणार असाल तर गृहमंत्र्यांना हटवा
सचिन वाझे प्रकरणानंतर राष्ट्रवादीने मुंबई पोलीस आयुक्त हटवण्याची मागणी केली असताना आता शिवसेनेचा एक गट आयुक्तांना हटवायचं झालं तर गृहमंत्र्यांनाही हटवण्याची मागणी होत आहे. गृहविभाग राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. अधिवेशनातही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समाधानकारक कामगिरी केली नाही. संजय राठोड असो वा सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री सरकारची बाजू सांभाळण्यास अपयशी ठरले असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख(Home Minister Anil Deshmukh) यांना हटवण्याची मागणीही शिवसेनेच्या एका गटाने केली असल्याची बातमी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याची बैठक
संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक होणार आहे, या बैठकीत शरद पवार मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत, त्याचसोबत मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीबाबतही चर्चा होईल, त्यामुळे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.