मुंबई – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, यानंतर या गाडीच्या मालकाचा मृतदेह आढळला, या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर विरोधकांनी विधिमंडळ अधिवेशनात ठाकरे सरकारला कोंडीत पकडलं होतं, तेव्हा गृहमंत्री अनिल देशमुखांपासून इतर सत्ताधारी आमदारांनी वाझेंची पाठराखण केली होती, इतकचं नव्हे तर सचिन वाझे हे लादेन आहेत का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला होता.( Anil Deshmukh in trouble due to Sachin Waze case, possibility of going for Home Ministry, NCP Sharad Pawar will take the decision)
सध्या NIA कडून मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. यात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधात पुरावे सापडल्याने NIA ने त्यांना अटक केली आहे, यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला तडा गेला आहे. यासाठी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवारांनी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली, या भेटीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख(Home Minister Anil Deshmukh) यांच्या मंत्रिपदावर गंच्छती येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सचिन वाझे प्रकरणावरून शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद?; शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट
शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्यात अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली, यात सचिन वाझे प्रकरणावरून चर्चा झाल्याची माहिती आहे, यात मंत्रिमंडळ फेरबदलाबाबतही पवार आणि ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुशांत सिंग राजपूत ते सचिन वाझे आत्महत्या प्रकरणापर्यंत अनेक वेळा गृहमंत्री अनिल देशमुख सरकारची बाजू ठामपणे मांडण्यात अपयशी ठरल्याचं चित्र समोर येत आहे. अधिवेशनातही गृहमंत्री अनिल देशमुखांची कामगिरी समाधानकारक राहिली नाही, त्यामुळे अनिल देशमुखांच्या गृहमंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे.
४ वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मंत्र्यांची आणि नेत्यांची बैठक होत आहे, या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेची माहिती शरद पवार नेत्यांना देतील, त्याचसोबत मंत्रिमंडळातील खातेबदलाबाबतही शरद पवार नेत्यांची चर्चा करण्याची शक्यता आहे, सध्या गृहमंत्री पदासाठी अजित पवार, जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे, राज्याच्या मंत्रिमंडळात वनमंत्री पदही रिकामं आहे, संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर अद्याप वनखात्याचा कारभार मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ फेरविस्ताराबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची बातमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार गृहमंत्री अनिल देशमुखांबद्दल काय भूमिका घेणार हे काही काळात स्पष्ट होईल.