मुंबई : परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडून मागवून राज्यपालांनी तो राष्ट्रपतींकडे पाठवावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी केली. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करावी, अशी मागणी केली.
राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मागणीसाठी भाजपचे शिष्टमंडळ बुधवारी राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी पत्र परिषदेत दिली. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत, सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली किंवा सीबीआयमार्फत चौकशी होणे अत्यावश्यक आहे. परमबीर सिंग यांनी यापूर्वीच वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील प्रमुख मंडळींना या सर्व प्रकरणा संदर्भात माहिती दिल्याचे पत्रात नमूद केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतल्याचे दिसून आलेले नाही. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून या घटनांबाबत अहवाल मागवावा व त्याची सत्यता तपासून तो राष्ट्रपतींना पाठवावा, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.
आंबेडकर यांची मागणी
- ‘राज्यात राजकारणाचे आणि पोलीस प्रशासनाचे गुन्हेगारीकरण झाले असून दोघांनीही जनतेचा विश्वास गमावला आहे. दोन्ही मिळून रक्ताची होळी खेळत आहेत.
- गृहमंत्र्यांनी महिन्याकाठी शंभर कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते हा आरोप गंभीर स्वरुपाचा आहे. हा फंड सत्तेतील तिन्ही पक्षांसाठी होता का याचीही चौकशी झाली पाहिजे.
- राज्यातील सध्याचे वातावरण राष्ट्रपती राजवटीस योग्य असेच आहे. हे करताना विधानसभा भंग करू नये. तीन चार महिन्यात नवीन सरकार येईल, असे आंबेडकर यांनी राज्यपालांना सांगितले.