Sachin Vaze: “सचिन वाझेंना ‘ती’ मर्सिडीज घेण्यासाठी नाना पटोले अन् सचिन सावंत यांनीच मदत केली”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 03:52 PM2021-03-17T15:52:03+5:302021-03-17T15:55:09+5:30
Mukesh Ambani Bomb Scare, Mansukh Hiren Death, BJP Allegations on Congress: ठाकरे सरकारची हेराफेरी अजूनही सुरुच आहे. रोज नवीन हेराफेरी या ठाकरे सरकारच्या काळात सुरू आहे.
मुंबई – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचा तपास NIA कडून सुरु आहे, यातच NIA ने स्कॉर्पिओ, इनोव्हापाठोपाठ आता सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कारही जप्त केली आहे. या कारच्या डिक्कीतून ५ लाख रुपयांची रोकड आणि नोटा मोजायची मशीन सापडल्याने खळबळ उडाली. मात्र आता या कारवरून काँग्रेस आणि भाजपात जुंपल्याचं दिसून येत आहे.(BJP Ashish Shelar Target Congress Nana Patole & Sachin Sawant in Sachin Vaze Case)
सचिन वाझे अडकले, CCTV फुटेजमध्ये दिसणाऱ्या ‘त्या’व्यक्तीचा शोध लावण्यात NIA ला मोठं यश
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी जप्त केलेल्या मर्सिडीजसोबत भाजपा नेत्याचे फोटो असल्याचं ट्विट केलं होतं, त्यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देत सचिन वाझेंना ती कार घेण्यासाठी नाना पटोले आणि सचिन सावंत यांनीच मदत केल्याची माहिती आमच्याकडे आली आहे. त्यामुळे चौकशी स्वत:कडे येते की काय या भीतीन काँग्रेसचे नेते भाजपावर बिनबुडाचे आरोप करत आहेत, यातील सत्यता तपास यंत्रणांनी पुढे आणावी अशी मागणी शेलारांनी केली आहे.
नाना पटोले आणि सचिन सावंत यांनीच 'ती' मर्सिडीज घेण्यासाठी सचिन वाझेंना मदत केली, अशी माहिती समोर येते आहे. चौकशी स्वतःकडे येते की काय या भीतीने काँग्रेस नेते भाजपावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. - @ShelarAshishpic.twitter.com/W0HAwSStTk
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 17, 2021
तर दुसरीकडे सचिन सावंतांना रोज काही ना काही ट्विट करायची सवय आहे. भाजपच्या एक युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा त्या मर्सिडीज सोबत फोटो आहे. याचा अर्थ हा नाही की त्या फोटोचा आणि कार्यकर्त्याचा त्या कारशी संबंध आहे. तरुणांमध्ये क्रेझ असत फोटो काढण्याचं तसाच तो फोटो आहे असा टोला भाजपा नेते संजय कुंटे यांनी लगावला आहे.
ठाकरे सरकारची हेराफेरी
ठाकरे सरकारची हेराफेरी अजूनही सुरुच आहे. रोज नवीन हेराफेरी या ठाकरे सरकारच्या काळात सुरू आहे. एका गुन्ह्याला लपवण्यासाठी दुसरा गुन्हा केला जातोय. पूजा चव्हाणप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर सचिन वाझे प्रकरण उघड झाले. त्याचा फायदा घेत राठोड प्रकरणातील ऑडिओ क्लीप ज्या सांताक्रूझ येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये छेडछाड सुरु आहे की काय? तो आवाज संजय राठोड यांचा नाहीच असे अहवाल तयार होण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत छेडछाड होण्याची शक्यता आहे असा गंभीर आरोपही आशिष शेलार यांनी सरकारवर केला आहे.
काय म्हणाले होते सचिन सावंत?
सचिन सावंत यांनी पुराव्यानिशी फोटो ट्विट केल्यामुळे खळबळ उडाली. मनसुख हिरेन यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला, त्या दिवशी हिरेन यांनी एका मर्सिडीज गाडीतून प्रवास केला. त्याच मर्सिडीज कारसोबत ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी देवेन हेमंत शेळके (Deven Hemant Shelke) यांचा फोटो आहे. देवेन शेळके यांची १७ ऑक्टोबर २०२० रोजी भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे ग्रामीणच्या सचिवपदी निवड करण्यात आली होती. याबाबतचे नियुक्ती पत्र सचिन सावंत यांनी ट्विट केले. तसेच मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्या दिवशी याच गाडीतून प्रवास केला होता. आता याबद्दल भाजप नेत्यांनी खुलासा करावा, अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली होती.