मुंबई – मनसुख हिरेन प्रकरण आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांची गाडी यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे, यातच पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना NIA ने अटक केल्यानं महाविकास आघाडी सरकारभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे, या प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणेंनी थेट युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप लावले होते, त्यानंतर वरूण सरदेसाई यांनी राणे कुटुंबावर हल्लाबोल करत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला, त्यावर पुन्हा नितेश राणे यांनी वरूण सरदेसाईंना प्रत्युत्तर दिलं आहे.(BJP MLA Nitesh Rane Target Yuvasena Secretary Varun Sardesai over Sachin Vaze Case)
यावर पत्रकार परिषद घेत नितेश राणे म्हणाले की, तुम्ही तुमच्याकडे असलेली खरी माहिती तपास यंत्रणेकडे पोहचवाल तर आम्ही तुमच्या विरुद्ध नोटीस काढून तुमच्यावर कोर्टाचा दबाव टाकू असा धमकावण्याचा प्रयत्न आहे. वरूण सरदेसाई सचिन वाझेंना ओळखतात की नाही? त्यांच्यासोबत फोनवरून संभाषण झालंय की नाही? याबद्दल त्यांनी पत्रकार परिषदेत काहीच सांगितलं नाही. आमच्या कुटुंबावर खालच्या पातळीचे आरोप केले तर तुमची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू असं त्यांनी सांगितलं.
तसेच पार्श्वभूमी कोणाला सांगताय, आम्ही ३९ वर्ष बाळासाहेब ठाकरेंची(Balasaheb Thackeray) सेवा करत होतो, त्यामुळे आम्हाला सगळी अंडीपिल्ली माहिती आहे, आम्हाला तोंड उघडायला लावायचं असेल आणि रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल, नंदकुमार चर्तुवेदी असे अनेक विषय बाहेर काढायची तयारी असेल तर पाठवा आम्हाला कायदेशीर नोटीस, पुन्हा अशी एक पत्रकार परिषद घेत सगळं बाहेर काढेन, त्यामुळे आम्हाला धमकी देऊ नये असा इशारा आमदार नितेश राणे यांनी वरूण सरदेसाई यांना दिला आहे.
“आरोप सिद्ध करून दाखवा, नाहीतर...”; वरूण सरदेसाईंचा आमदार नितेश राणेंना इशारा
लग्न जमत नसेल तर शादी डॉटकॉमवर जा
लग्न होत नसेल तर शादी डॉटकॉम जा, बायडोटा पत्रकार परिषद घेऊन सांगायचा असतो का? आमच्या कुटुंबाबद्दल जे खालच्या पातळीचे आरोप केलेत, ते पुन्हा करू नयेत. राज्याविरोधात अशी कृत्य करत असाल आणि त्याच्याविरोधात विरोधी पक्ष म्हणून भाजपाने बोलायचं नाही ते आम्हाला जमणार आहे, जी सध्या परिस्थिती आहे, ती मांडली आहे. तपास यंत्रणेने विचारलं तर ही खरी माहिती आम्ही त्यांना देणारच आहे. उगाच आरोप करणं, टाईमपास करण्यापेक्षा मनसुख हिरेन, सचिन वाझे प्रकरणात सत्य बाहेर आलं पाहिजे अशा शब्दात नितेश राणेंनी वरूण सरदेसाईंना फटकारलं.
...म्हणून पोलीस संरक्षण मिळालं असावं
वरूण सरदेसाई पत्रकार परिषदेत म्हणाले, राणे कुटुंबापासून धोका असल्याने संरक्षण मिळालं असेल, पण टेंडरसाठी अधिकाऱ्यांना त्रास दिला जातो, फोन केले जातात, आमदारांवर दबाव टाकले जातात. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांना संरक्षण दिलं आहे असा टोला नितेश राणेंनी लगावला.