सांगली – भाजपा आमदार गोपीचंद पडळकर नेहमी चर्चेत राहणारा चेहरा आहेत, कधी शरद पवारांवर(Sharad Pawar) बोचरी टीका तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(CM Uddhav Thackeray) टोला अशा विविध कारणांवरून गोपीचंद पडळकर हे माध्यमात आणि सोशल मीडियात चर्चेचा विषय बनतात, पण सध्या त्यांनी केलेल्या एका कृत्यामुळे अनेक कार्यकर्ते त्यांच्या प्रेमात पडले आहेत, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांनीही पडळकरांचं भरभरून कौतुक केले आहे.
गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) हे आमदार व्हावेत यासाठी पायात चप्पल घालणार नाही असा पण दत्तात्रय कटरे, नारायण पुजारी आणि दिवंगत जालिंदर क्षीरसागर यांनी केला होता, तसेच फेटा घालणार नाही असा पण अमरसिंह देशमुख यांनी केला होता, या कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा आटपाडी तालुक्यातील झरे येथे पार पडला. या कार्यक्रमाला सदाभाऊ खोत, आमदार जयकुमार गोरे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती.
गोपीचंद पडळकरांनी आमदार होण्यासाठी पण करणाऱ्या या कार्यकर्त्यांचे पाय धुवून त्यांना चांदीची चप्पल व दुचाकी प्रदान केली. दत्तात्रय कटरे, नारायण पुजारी यांनी पण केल्यापासून चप्पल घातली नव्हती. तर जालिंदर क्षीरसागर यांनी केस-दाढीचे पैसे घेतले नव्हते. कार्यकर्त्यांचा हे ऋण फेडण्यासाठी हा कार्यक्रम आमदार गोपीचंद पडळकर यांच्याहस्ते पार पडला.
“मी आयुष्यात कधीच चप्पल पुजली नाही, परंतु…”
यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांच्यावरील कार्यकर्त्यांचे प्रेम हिमालयाच्या उंचीचे आहे. गरीब कुटुंबात जन्माला आलेला हा कार्यकर्ता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तळागाळातील माणसे उंचावर नेली. सोन्यासारखी माणसे मिळाल्याने सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आमदार झाला. मी आयुष्यात कधीच चप्पल पुजली नाही, परंतु गोपीचंद पडळकरांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी चप्पल पुजली. कार्यकर्त्यांवर प्रेम कसे करावे, हे गोपीचंद पडळकर यांच्याकडून शिकावे असं कौतुक सदाभाऊ खोत यांनी केले.
सध्याचे सरकार आंधळे, मुके व बहिरे
तसेच सध्याचे सरकार आंधळे, मुके व बहिरे आहे. अधिवेशनात विरोधक आवाज उठवतील, त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचा बाऊ सरकार करत आहे. हे शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार आहे असा आरोप सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारवर केला.