भोपाळ – भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार राजकारण पेटलं आहे. रविवारी डॉ. गोविंद सिंह आणि विश्वास सारंग एकमेकांसमोर आले आणि नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कोणीतरी काँग्रेस कार्यालयाबाहेर सरकारी पोलवर भगवा झेंडा फडकवला, त्यावर काँग्रेसने आक्षेप नोंदवला. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलं होतं.
या प्रकरणी कॅबिनेट मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, भगवा रंग मान-सन्मानाचं प्रतीक आहे, काँग्रेस भगव्या रंगापासून अंतर ठेवत आहेत, त्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली आहे. काँग्रेसवाल्यांनी भगव्याचा आदर करावा. विशेष म्हणजे रविवारी कॉंग्रेस आणि भाजप नेते आमनेसामने आले. गोविंद सिंह यांनी आमदारांच्या प्रश्नाकडून भाजपा पळ काढतेय असा आरोप केला तर विश्वास सारंग यांनी कॉंग्रेस नेत्यावर खोटी विधाने करून विधानसभा अधिवेशन तहकूब केल्याचा आरोप केला. माजी मंत्री डॉ. गोविंद सिंह यांनी माध्यमांना सांगितले की, विधानसभेत आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना सरकारने उत्तरे दिली पाहिजेत. सध्या विधानसभेत बावीस हजार प्रश्न प्रलंबित आहेत. याची उत्तरे यायला हवीत.
मुख्यमंत्री शिवराज चौहान यांना पत्र लिहिणार
माजी मंत्री म्हणाले की, या प्रकरणात प्रोटेम स्पीकर रामेश्वर शर्मा आणि सीएम शिवराज यांनाही पत्र देतील. सर्वपक्षीय बैठकीत आमदारांना प्रश्न देण्यासाठी समिती स्थापन करण्याबाबत सहमती दर्शविली गेली होती, परंतु अधिवेशन तहकूब झाल्यामुळे समिती अद्याप स्थापन झालेली नाही. सार्वजनिक प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने राज्यात अराजकता वाढत आहे.
कॉंग्रेसमुळे विधानसभा अधिवेशन तहकूब
डॉ गोविंद सिंह यांच्यावर पलटवार करताना कॅबिनेट मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, विरोधकांमुळे आमदारांच्या प्रश्नांची उत्तरे येत नाहीत. सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्ष नेत्यांनी अधिवेशन तहकूब करण्यास सहमती दर्शविली होती. विधानसभेचे अधिवेशन व्हावे अशी कॉंग्रेसची इच्छा नाही असं त्यांनी सांगितले, राज्य सरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार आहे. कॉंग्रेस पक्षाचे आमदार प्रश्नांबाबत खोटी विधाने करीत आहेत असा आरोप त्यांनी केला.
युवक शिबिरावरही विश्वास सारंग यांनी लावले आरोप
युवक कॉंग्रेसच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या संदर्भात राजकारण सुरू झालं आहे. युवक कॉंग्रेसला आक्रमक व्हावे लागेल, आक्रमकता ही युवक कॉंग्रेसची ओळख आहे. संजय गांधींच्या काळात युवक कॉंग्रेस ही सर्वात मजबूत संघटन होतं. विक्रांत भूरिया यांच्या नेतृत्वात युथ कॉंग्रेस पुन्हा मजबूत होईल असं डॉ. गोविंद सिंह म्हणाले, त्यावर भाजपाचे कॅबिनेट मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, युवक कॉंग्रेसची ओळख ही भ्रष्ट संघटन आणि अनुशासनहीन आहे. युवक कॉंग्रेसने तरुणांमधील विश्वासार्हता गमावली आहे.