‘साहेब’ झुकले ते कार्यकर्त्यांच्या दबावामुळे....आणि म्हणून निवडला ‘पार्थ ’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 12:03 PM2019-03-12T12:03:07+5:302019-03-12T12:15:30+5:30
लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांत राष्ट्रवादीला पक्ष अंतर्गत गटबाजी व बंडखोरीचा फटका बसला.
- हणमंत पाटील-
पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांच्या दबावापुढे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे झुकले आहेत. त्यांनी एक पाऊल मागे घेत पक्षातील गटबाजी व बंडखोरी रोखण्यासाठी पार्थ पवार यांच्या उमेदवारीची खेळी केली. सुरूवातीला पवार यांनी नकार दिला असला तरी पार्थची उमेदवारी ही अपेक्षितच होती.
लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांत राष्ट्रवादीला पक्षाअंतर्गत गटबाजी व बंडखोरीचा फटका बसला. त्याचा फायदा होऊन शिवसेनेचे गजानन बाबर व श्रीरंग बारणे विजयी झाले होते. आगामी निवडणुकीत गटबाजी रोखण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मुलगा पार्थ यांना उमेदवारी देण्याची चाचपणी सहा महिन्यांपूर्वीच सुरू होती. मावळ मतदार संघातील विविध कार्यक्रमांना पार्थ आवर्जुन उपस्थित राहू लागल्यानंतर त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली.
मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी, चिंचवड आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यांपैकी तीन भाजपाकडे, दोन शिवसेना व एक राष्ट्रवादीचे आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थातील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे जाळे आहे. शेतकरी कामगार पक्षाची राष्ट्रवादीशी आघाडी आणि युतीतील वादाच्या फायदा घेण्यासाठी पार्थ यांच्या उमेदवारीची खेळी करण्यात येत आहे. मतदार संघातील स्थानिक नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा व शेकापकडून शिफारस झाल्यानंतर शरद पवार यांनी एक पाऊल मागे घेत पार्थ यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखविला आहे.
--------------
गटबाजी रोखण्यासाठी खेळी
मतदार संघाच्या पुर्नरचनेनंतर २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार आझम पानसरे यांच्या निवडणुकीत आमदार लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी केली. त्याचा फायदा शिवसेनेचे खासदार गजानन बाबर यांना विजयासाठी झाला. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत बंडखोरी व गटबाजीच्या भीतीने राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी पक्षांतर करीत शेकापची उमेदवारी घेतली होती. राष्ट्रवादीतील गटबाजी व बंडखोरी रोखण्यासाठी पार्थ पवार यांच्या उमेदवारीची खेळी करण्यात आली आहे. पार्थ हे नवखे असलेतरी त्यांची उमेदवारी म्हणजे अजित पवार हेच मैदानात असल्याचे चित्र आहे.
---------------
युतीपुढे मनोमिलनाचे आव्हान
काही दिवसांपूर्वीच भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप समर्थक पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक नेते व पदाधिका-यांनी मावळ लोकसभा मतदार संघ शिवसेनेऐवजी भाजपाला देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना साकडे घेतले होते. शिवसेनेने विद्यमान खासदार बारणे यांचा पराभव झाल्यास भाजपाचे कार्यकर्ते जबाबदारी घेणार नाहीत, असा दावा केला होता. बारणे व जगताप यांचे टोकाचे वाद आहेत. त्यामुळे युतीपुढे दोन्ही पक्षातील नेते व कार्यकर्त्यांचे मनोमीलन करण्याचे आव्हान आहे.
-------------