लखनौ - उत्तर प्रदेशमधील विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. (Uttar Pradesh Politics) त्याचदरम्यान, राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, मुख्यमंत्री बदलला जाणार अशा चर्चांना वेग आला आहे. आरएसएस तसेच भाजपा नेत्यांनी एका पाठोपाठ एक केलेले दौरे आणि वक्तव्यांमुळे तर्कवितर्कांना अधिकच उधाण आले. (Yogi Adityanath) दरम्यान, या सर्व हालचालीवंर अखेर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Will there be a reshuffle in the cabinet, will the Chief Minister's chair go? Yogi Adityanath finally spoke)
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या असून, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपा दोन तृतियांश बहुमताने विजयी होईल, असा दावा योगींनी केला आहे.
ते म्हणाले की, काही लोक नेत्यांचे होत असलेले दौरे आणि बैठकांचा वेगवेगळा अर्थ लावत आहेत. तसेच त्याला वेगळे राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ते पूर्णपणे चुकीचे आहे. या सर्व घटनाक्रमाला प्रसारमाध्यमांनी लक्ष वेधून घेण्यासाठी सनसनाटी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असा टोला योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे.
नेत्यांच्या दौऱ्याबाबत योगी म्हणाले की, पक्षाच्या नेत्यांनी दौरे करणे ही बाब काही नवीन नाही. भाजपा हा कॅडरबेस पक्ष आहे. तो घराणेशाहीवर चालत नाही. पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवतो. त्यासाठी दर दोन महिन्यांनी वरिष्ठ नेते भेटी घेतात. तसेच राज्याच्या कार्यकारिणीसोबत बैठका घेतात. आमचे राज्य प्रभारी राधामोहन सिंह महिन्यातून दोन वेळा उत्तर प्रदेशात येतात. पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी चार महिन्यांपूर्वी स्वत:ही लखनौचा दौरा केला होता.
यावेळी योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रीय राजकारणात उतरण्याची शक्यताही फेटाळून लावली आहे. ते म्हणाले की, जेव्हा मी खासदार होतो तेव्हाही माझी खास अशी महत्त्वाकांक्षा नव्हती. आज सुद्धा माझी काही महत्त्वाकांक्षा नाही आहे. मी भाजपाचा एक सामान्य सैनिक आहे जो भाजपाचे व्हिजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास, सुरक्षा आणि समृद्धी या कँपेनसाठी काम करत आहे. कोरोनाची साथ वाढत असतानाही राज्याने आर्थिक विकास आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यात यश मिळवले आहे, असेही योगींनी अधोरेखित केले.