पुणे – जेजुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे. मात्र तत्पूर्वी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्याला आक्षेप घेत शुक्रवारी पहाटे ५ वाजताच जेजुरी गडावर जाऊन पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न केला.
अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवारांसारख्या भ्रष्ट नेत्याने करावे हा अहिल्यादेवींचा अपमान आहे असं विधान पडळकरांनी केलं, त्यानंतर गोपीचंद पडळकर आणि कार्यकर्ते यांनी पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी जेजुरी गडावर गोंधळ घातला, परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद तात्काळ मिटला, मात्र आता यावरून संभाजी ब्रिगेडने गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला आहे. कोणत्याही महापुरुषांच्या कर्तृत्वाचा इतिहास समाजात रुजविण्यासाठी पुतळे, शिल्प उभे केले जातात. जेजुरी येथे सुद्धा अहिल्याराणी होळकर यांचा पुतळा बसवण्यात येत आहे त्याचे अनावरण राज्य सरकारच्या वतीने अधिकृत केले जाईल. मात्र सत्तेच्या आणि पदाच्या हव्यासा पोटी विरोधाचे विष पिऊन काही तथाकथित गोपीचंद पडळकर सारखे आमदार हे स्टंट करण्यासाठी पुतळ्याचे अनावरण करतात, हा त्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा सुद्धा अवमान आहे. जर सरकार पुतळ्याची स्थापना किंवा अनावरण करणार असेल यांच्या पोटात राजकारणाचे पिल्लू का वळवळ करत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे असं सांगत पडळकरांच्या भूमिकेचा निषेध केला.(Sambhaji Brigade Target BJP MLC Gopichand Padalkar over criticism of Sharad Pawar)
तसेच राजमाता अहिल्याराणी होळकर यांनी स्वकर्तृत्वावर स्वराज्यासाठी संघर्ष केला आहे. त्या लढल्या, समाजहिताचे काम करत राहिल्या. अंधश्रद्धा, कर्मकांड विरोधात त्यांनी कडाडून विरोध केला. शिंदे-होळकर घराण्याचा नाव मोठ करत राहिल्या, म्हणून इतिहास त्यांच्या कर्तृत्वाची आजही प्रामुख्याने नोंद घेऊन साक्ष देत आहे. हा इतिहास आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांना जर एवढेच पुतळा अनावरणाची घाई होत असेल तर त्यांनी ५ वर्षात भाजपानं शब्द देऊनही धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही यासाठी सुद्धा जाब विचारला पाहिजे. फालतुगिरी करायचे धंदे त्यांनी आता आमदार झाल्यामुळे बंद करावेत असा टोला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी लगावला आहे.
पडळकरांनी पदाचा त्याग करावा
जेजुरी, खंडोबा आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्राचे कुलदैवत आणि अस्मिता आहे. सरकारने त्यांच्या पुतळ्याचे सन्मानाने अनावरण करून महापुरुषांचा सुद्धा सन्मान राखला गेला पाहिजे अशीच संभाजी ब्रिगेड आजपर्यंत भूमिका राहिलेली आहे. गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणासाठी स्वतःचा किंवा पदाचा त्याग करावा. पक्षाची वेठबिगारी करण्यासाठी विनाकारण स्टंट अर्थात चमकोगिरी करू नये. अधिकृत उद्घाटन करण्यासाठी सरकारला पत्रव्यवहार करावा व मग शहाणपणा शिकवावा. असं कुठल्याही चळवळीतील कार्यकर्त्याला वाटेल. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनधिकृत अनावरण केलेला प्रकार हा निषेधार्ह आहे. या प्रकरणी जेजुरी देवस्थान समितीने व राज्य सरकारने आमदार गोपीचंद पडळकर व त्यांच्या सहकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल केले पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.
काय आहे वाद?
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांसह आज पहाटे साडेपाच वाजता जेजुरी गडावर पोहचले, अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं उदघाटन व लोकार्पण झाल्याची घोषणा त्यांनी केली. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पडळकर आणि शेकडो कार्यकर्त्यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि मार्तंड देव संस्थांनच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापटही झाली. कार्यकर्त्यानी चौथऱ्यावर जाऊन पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुतळ्याच्या चौथऱ्यावर त्यांना जाऊ दिले नाही. यावेळी शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.