Sambhaji Raje: नांदेडमध्ये मराठा समाजाकडून मुक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात कोविक प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन झाल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. यात एकूण २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच मुद्द्यावरुन भाजपा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे.
"गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा, सामान्य गरीब मराठा बांधवांवर का? समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळ न्याय, असे का?", असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.
संभाजीराजेंनी यासंदर्भात एक ट्विट केलं असून या ट्विटमध्ये मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची प्रत देखील ट्विट केली आहे.
नांदेड येथे शुक्रवारी मराठा समाजाच्या वतीनं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मूक मोर्चाची हाक देण्यात आली होती. खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्त्वात हे आंदोलन पार पडलं. हा लॉकडाऊन नंतरचा मराठा आरक्षणाचा पहिलाच मूक मोर्चा आहे. यावेळी संभाजीराजे छत्रपतींनी आक्रमक पवित्रा घेत मराठा समाजाची भूमिका मांडली. तसेच मराठा आरक्षण मंजूर करण्यासाठी त्यांना काही पर्यायही सुचवले होते.
"मी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यासाठी इथं आलो नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा विचार सांगायला आलोय. जर माझं ऐकायचं असेल, तर आपण बोलूच. माझे फोटो काढून काहीच उपयोग नाही. किती फोटो काढायचे?", असं संभाजीराजे म्हणाले होते.