औरंगाबाद की संभाजीनगर? नामांतर प्रस्ताव मंत्रिमंडळासमाेर येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 06:50 AM2021-01-09T06:50:54+5:302021-01-09T06:52:10+5:30
Aurangabad Rename : शिवसेनेची खेळी; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष
- अतुल कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याच्या मागणीवरून आधीच राजकीय गदारोळ उठलेला असताना आता थेट मंत्रिमंडळापुढे नामांतराचा प्रस्ताव आणण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा याला विरोध असताना असा प्रस्ताव आणला जात असेल तर त्यामागे मोठी राजकीय खेळी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराला तीव्र विरोध केलेला आहे. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात याचा समावेश नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. असे असताना ‘सीएमओ महाराष्ट्र’ या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरून ‘संभाजीनगर’ असा उल्लेख वारंवार करण्यात येत आहे. त्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली. ती ‘प्रिंटिंग मिस्टेक’ होती, असा खुलासा माहिती व जनसंपर्क खात्याचे राज्यमंत्री असलम शेख यांनी केला. मात्र स्वत: मुख्यमंत्री ठाकरे यांनीच गुरुवारी पुन्हा ‘संभाजीनगर’ असा उल्लेख करून ट्विट करण्याची सूचना केली. त्यामुळे त्यांनी ही ठरवून केलेली कृती असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासह सेनेचे नेते कायम औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करत आले आहेत. त्यामुळे जे आम्ही कायम म्हणत आलो त्या भूमिकेत कसा बदल करणार? आम्ही संभाजीनगरच म्हणणार, असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र माहिती खात्याच्या वतीने
काढण्यात येणाऱ्या प्रसिद्धिपत्रकांमध्ये ‘औरंगाबाद’ असा उल्लेख करण्याच्या तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत.
मंत्र्यांना बैठकीला हजर राहण्याची सक्ती
n कोरोनामुळे आठ-दहा महिने मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्री ऑनलाइन सहभागी होत.
n मात्र आता वर्षा, सह्याद्री किंवा मंत्रालयातच या बैठका होणार असून त्यासाठी सर्व मंत्र्यांना प्रत्यक्ष हजर राहावे लागेल, असा आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी काढला आहे.
n त्यामुळे प्रशासनाच्या कामात
गती येईल आणि निर्णय घेणे सोपे जाणार आहे. शिवाय व्हर्च्युअल
मिटिंग नसल्याने गुप्तताही पाळली जाणार आहे.
सर्व काही महापालिका निवडणुकीसाठी!
मुंबईसह औरंगाबाद आणि अन्य काही शहरांतील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या तीनही पक्षांनी संभाजीनगरचा मुद्दा जाणीवपूर्वक पुढे केला आहे.
शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या सांगण्यानुसार, भाजपची औरंगाबादमधील स्पेस कमी करण्यासाठी ठरवून केलेली ही राजकीय खेळी आहे. त्याचाच भाग म्हणून अगदी सुरुवातीला औरंगाबाद शहरात ‘संभाजीनगर’ अशी अक्षरे ठिकठिकाणी लावली गेली.
त्यासाठी शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्यांनी सूचना केल्या होत्या. नंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी औरंगाबाद विमानतळाचे नाव संभाजीनगर करण्याविषयी केंद्राला पत्र पाठवले. त्याचाच पुढचा भाग म्हणून मंत्रिमंडळ बैठकीत संभाजीनगर नामांतराचा प्रस्ताव आणला जाणार आहे.