मुंबई: राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. आरक्षणाच्या विषयावरून विरोधक सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत, तर दुसरीकडे इंधनदरवाढ, महागाईविरोधात काँग्रेस केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला असून, एकीकडे कोरोनाचा उद्रेक तर दुसरीकडे अशोकरावांचे आंदोलन, हे बरोबर आहे का, अशी विचारणा केली आहे. (sambhajiraje criticised ashok chavan over agitation in nanded)
इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन काँग्रेसकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आले. त्यात सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये पार पडलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावरून आता भाजप खासदार संभाजीराजे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.
“आम्हाला वादात पडायचं नाही, ठाकरे सरकारने कृषी विधेयक तातडीने मागे घ्यावं”
हे बरोबर आहे का?
संभाजीराजे यांनी ट्विट करत अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. एकीकडे कोरोनाचा उद्रेक तर दुसरीकडे अशोकरावांचे आंदोलन…त्यात ते म्हणताय विराट मोर्चा झाला, जोरदार आंदोलन पार पडले अणि त्यात सहभागी झालेल्या जेष्ट नागरिक आणि लहान मुलांचे आभार मानले. आता हे बरोबर आहे का?, अशी विचारणा संभाजीराजे यांनी केली आहे.
अशोक चव्हाणांची मोदी सरकारवर टीका
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत असला, तरी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरूच ठेवणार आहे. युपीए सरकारच्या कार्यकाळात पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली तर विरोधी पक्ष म्हणून भाजप मोठ्या प्रमाणात टीका करत होते. त्यांनी त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतही मोठा गोंधळ घातला होता. आता मात्र, पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या वर गेले आहेत. तर डिझेलचे दरही वाढले आहेत, या शब्दांत अशोक चव्हाण यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात हल्लाबोल केला.
“मतदान घ्या, मग तुमची ताकद पाहू; बहुमत आहे, तर घाबरता कशाला?”: देवेंद्र फडणवीस
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हातात असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मोदी सरकार इंधनावरील करातून जनतेची राजरोस लूट करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.