अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर तालिबानींनी कब्जा केल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी रविवारीच देशाबाहेर पळून गेले असून, त्यामुळे अफगाण सैनिक आणि पोलिसांनीही आपली शस्त्रे टाकून दिली आहेत. ते तालिबानींना शरण जात आहेत. राष्ट्रपती निवासानंतर घनी यांचे कार्यालयही तालिबानी नेत्यांनी सोमवारी ताब्यात घेतले आणि तिथे आपला झेंडा लावला. 90 टक्के अफगाण तालिबानींनी ताब्यात घेतला आहे. तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनतेच्या मनात असल्याने मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. व्हिसा, पासपोर्ट नसूनही ते विमानतळाच्या दिशेने पळत आहेत.
भारतातील काही राजकीय नेते तालिबानच्या कारवाईच्या समर्थनात धक्कादायक विधान करत आहेत. यामध्ये समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क (Shafiqur Rahman Barq) यांच्यासारखे नेत्यांचाही समावेश आहे. "तालिबानची ही स्वातंत्र्यासाठी लढाई" असल्याचं वादग्रस्त विधान बर्क यांनी केलं आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची लढाई ही स्वातंत्र्यासाठी आहे असं म्हटलं आहे. "तालिबान अफगाण नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी लढाई लढत आहे. अफागाणिस्तानचे स्वातंत्र्य हा त्यांचा मुद्दा आहे. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे राज्य का आहे? तालिबान तिथली एक शक्ती आहे आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना त्यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य हवे आहे" असं देखील खासदारांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे.
तालिबानींच्या दहशतीने अफगाणिस्तानात हाहाकार
तालिबानने 20 वर्षांनी सत्ता काबीज केल्यावर जगाशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याचा दावा केला. मात्र, लूटमार, महिलांवर अत्याचार याची भीती नागरिकांमध्ये आहे. तालिबानने महिलांवर निर्बंध घातले. अफगाणी महिलांना शिक्षण, नोकरीचे स्वातंत्र्य होते. आता महिलांचे हाल होतील, अशी भीती आहे. भारतासह काही देशांनी अफगाणिस्तानात मोठी गुंतवणूक केली. अनेक भारतीयांनी तेथे व्यवसाय सुरू केले. आज या गुंतवणुकीवर प्रश्न निर्माण झाले आहेत. भारतातील अफगाणी नागरिकांचीही चिंता वाढली आहे. भारतात अनेक अफगाणी विद्यार्थी शिक्षणासाठी आलेले आहेत. इतर नागरिकही आहेत. एकीकडे मायदेशी कुटुंबीयांची चिंता तर दुसरीकडे व्हिसाशी संबंधित प्रश्न, अशा दुहेरी संकटात हे विद्यार्थी तसेच अनेक नागरिक अडकले आहेत.
"कोरोना हा आजार नाही, अल्लाहसमोर रडत माफी मागितल्यास होईल नष्ट"
शफीकुर्रहमान बर्क यांनी याआधीही अनेकदा वादग्रस्त विधान केलं आहे. "कोरोना हा आजार नाही, अल्लाहसमोर रडत माफी मागितल्यास होईल नष्ट" असं विधान सपा खासदाराने केलं होतं. त्यांच्या या विधानवरून वाद देखील निर्माण झाला होता. विधानावरून वाद निर्माण झाला आहे. "कोरोना हा काही आजार नाही. कोरोना जर आजार असता तर जगात त्यावर काहीती उपाय असता. कोरोनाचे संकट हे सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे आलेलं संकट आहे. अल्लाह समोर रडून माफी मागितल्यास हे संकट नष्ट होईल" असं शफीकुर्रहमान बर्क यांनी म्हटलं होतं. बर्क यांनी यांनी भाजपा सरकारवर देखील याआधी अनेक गंभीर आरोप केले आहेत.