सांगली – खासदार संजयकाका पाटील यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? अशी चर्चा सध्या सांगलीतील राजकीय वर्तुळात सुरू आहे. याला कारण असं की, जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत संजयकाकांचा पारा चढला आणि ते थेट तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडले. बैठकीत घडलेला हा प्रकार पाहून सदस्यांमध्ये वेगळीच चर्चा रंगली होती.(BJP MP Sanjay Patil unhappy in Meeting with Chandrakant Patil at Sangli)
रविवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) कार्यक्रमानिमित्त सांगलीत होते, मात्र खासदार असूनही संजयकाका पाटील(Sanjaykaka Patil) या कार्यक्रमात गैरहजर होते, विजयनगरच्या एका हॉटेलमध्ये पक्षाच्या सुकाणू समितीची बैठक होती, त्यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते, मात्र खासदारांच्या गैरहजेरीची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती, त्यातच बैठक संपतेवेळी संजयकाका पाटील बैठकीच्या ठिकाणी आले, तेव्हा चंद्रकांत पाटील हे पदाधिकारी बदलासाठी अध्यक्षांच्या बंगल्यावर गेले होते, खासदार पाटील प्रदेशाध्यक्षांना भेटण्यासाठी आत चर्चेसाठी गेले पण अवघ्या दोन-तीन मिनिटांच बाहेर आले. त्यावेळी संजयकाकांच्या चेहऱ्यावर काहीतरी बिनसल्यासारखं दिसून आले.
बंगल्याबाहेर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते, त्यांनी खासदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु काहीच न बोलता पाटील गाडीत जाऊन बसले. इतकचं नाही तर गाडीत बसताना दरवाजा जोरात बंद करण्यात आला, त्यावेळी तो आवाज बराच काही सांगणारा होता. खासदार जात असल्याचं पाहत एक व्यक्ती संजयकाका पाटलांच्या गाडीजवळ धावत आला आणि त्याने दादा परत बोलवत असल्याचा निरोप दिला. पण तरीही खासदार थांबले नाहीत, त्यांनी तिथून निघून जाणं पसंत केले.
काय आहे वाद?
गेल्या काही दिवसांपासून सांगलीत जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलासाठी खासदार आग्रही होते. बदलाचा निर्णय आजच झाला पाहिजे अशी भूमिका घेत माझ्यासाठी काम केलेल्या कार्यकर्त्यांना संधी मिळायला हवी, अशी संजयकाका पाटील यांची मागणी होती, पण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बदलाचा निर्णय लोंबकळत ठेवल्याचा राग खासदारांना आला. पहिल्यांदा महापालिकेचे पाहू, नंतर जिल्हा परिषदेची चर्चा करू, असा चंद्रकांत पाटील यांचा सूर होता, तो मान्य नसल्याने खासदार संतापले असावेत, अशी शक्यता उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली.