सांगली – महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत बहुमत असूनही भाजपाला(BJP) पराभवाचा सामना करावा लागला, सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या महापौर पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी आणि उपमहापौर पदावर काँग्रेसचे(Congress) उमेश पाटील विजयी झाले, ऐन निवडणुकीत भाजपाचे ७ सदस्य फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला(NCP) महापौरपदाची लॉटरी लागली. या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी आणि काँग्रेसने भाजपाला डिवचण्याचा प्रयत्न केला.
अशातच आता महापालिकेनंतर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या सदस्यांना नेत्यांच्या निरोपाची प्रतीक्षा लागून राहिली आहे, दोन दिवस कळ काढा, बैठकीचा निरोप मिळेल असं उत्तर नेत्यांकडून मिळालं आहे, जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलासाठी भाजपाचे सदस्य आक्रमक झाले आहेत. महापालिकेतील गोंधळामुळे गुरूवारची नियोजित बेठक रद्द करण्यात आली, परंतु पुढील २ दिवसात ही बैठक घेऊ असा निरोप नेत्यांकडून सदस्यांना मिळाला.(Sangli Political Updates)
शेवटची १५ मिनिटं, जयंत पाटलांचा एक फोन अन् भाजपाची दाणादाण; कसा होता राष्ट्रवादीचा गेम?
महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा टप्प्यात कार्यक्रम केलाच अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून दिली गेली, सांगलीतील राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे पाटील-विरुद्ध भाजपाचे पाटील असा आमना-सामना पाहायला मिळत आहे, महापालिका निवडणुकीत बसलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी भाजपा नेते वेळ घेत आहेत, गुरुवारची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रद्द केली, तरी भाजपाचे अनेक सदस्य दिवसभर जिल्हा परिषदेत थांबून होते,
भाजपाच्या सदस्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीही बारकाईने लक्ष ठेऊन आहे, महापालिकेचा पॅटर्न जिल्हा परिषदेत राबवता येतो का? याची चाचपणीही सुरू आहे, जिल्हा परिषदेचा कार्यकाळ अवघ्या १ वर्षाचा शिल्लक असल्याने अनेक उलाथापालथी पाहायला मिळू शकतात. पदाधिकाऱ्यांमध्ये बदल न झाल्यास प्रसंगी अविश्वास ठरावाचा पवित्राही घेतला जाऊ शकतो, त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीही वाहत्या गंगेत हात धुण्याची तयारी आहे.
महापौर-उपमहापौर निवडणुकीत काय झालं?
सांगली-मिरज महापालिका महापौर-उपमहापौर(Sangli Miraj Corporation Mayor Elections) निवडणुकीत भाजपाला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता मिळवली, बहुमत असूनसुद्धा भाजपाला महापौरपदाच्या निवडणुकीत हार मानावी लागली, या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्विजय सिंह महापौर तर काँग्रेसचे उमेश पाटील उपमहापौर म्हणून निवडून आले. महापौर निवडणुकीत भाजपाच्या सत्तेला सुरुंग लावण्यात आघाडीला यश आलं, राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी यांनी भाजपाचे धीरज सूर्यवंशी यांचा ३९ विरुद्ध ३६ मतांनी पराभव केला, तर उपमहापौरपदी काँग्रेस उमेश पाटील यांनी भाजपाच्या गजानन मगदुम यांच्यावर मात केली.
महापालिकेत एकूण सदस्यसंख्या ७८ असून यात सहकारी सदस्यांसह भाजपाचं संख्याबळ ४३ इतकं आहे, तर काँग्रेसचे १९ आणि राष्ट्रवादीचे १५ सदस्य आहेत. बहुमत असतानाही भाजपाची सात मतं फुटल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचा विजय सुकर झाला. भाजपाचे ९ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसने फोडून त्यांना अज्ञातस्थळी हलवले होते, त्यापैकी दोघे स्वगृही परतले, मात्र ७ नगरसेवक शेवटपर्यंत नॉट रिचेबल राहिले, ही सात मते फुटल्याने भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला.