बुलडाणा - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात कोरोनासंदर्भाने शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जमलेले भाजपाचे कार्यकर्ते व त्यास विरोध करण्यासाठी समोर आलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये १८ एप्रिल रोजी बुलडाण्यात राडा झाला. याप्रकरणी उभय बाजूंनी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्याची प्रक्रिया सुरू होती.(Clashes Between Shivsena & BJP Over MLA Sanjay Gaikwad Controversial Statement on Devendra Fadnavis)
यामध्ये भाजपचे नेते तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह एक जण किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती आहे. १८ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जयस्तंभ चौकात भाजपाचे पदाधिकारी योगेंद्र गोडे, माजी आ. विजयराज शिंदे, भाजपचे शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांच्यासह भाजपचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेचे आ. संजय गायकवाड यांचा निषेध करण्यासाठी त्यांचा पुतळा जाळण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना त्यास विरोध केला.
“तुझ्या मायनं दूध पाजलं असेल तर...”; शिवसेना आमदार संजय गायकवाडांची भाजपा आमदाराला धमकी
दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची होऊन राडा झाला. त्यावेळी झालेल्या हाणामारीत तीन ते चार जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण निवळण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिस्थितीचे गांभीर्य पाहता उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते व बुलडाणा शहर पोलिस ठाण्याचा बंदोबस्त, शीघ्र कृती दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, जयस्तंभ चौकातून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात पोहोचले होते. या राड्यामध्ये भाजपाचे नेते माजी आ. विजयराज शिंदे यांच्यासह दोन ते तीन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. शिंदे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात यानंतर वैद्यकीय तपासणीही केली.
दुसरीकडे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनीही या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसात तक्रार दिली असून माजी आमदार शिंदे यांनीही आपल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढविल्याचा आरोप केला आहे. पोलीस प्रशासनाकडूनही दोन्ही गटांविरोधात संचारबंदीचा भंग तथा आपत्तीव्यवस्थापन कायदा आणि साथरोग नियंत्रण कायद्याचा आधार घेत गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती ठाणेदार प्रदीप साळुंके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. घटनेचा गांभीर्य पाहता अप्पर पोलिस अधीक्षक बजरंग बनसोड, एसडीपीओ रमेश बरकते यांनी पोलिस ठाण्यात ठाण मांडले आहे.
फडणवीस व कुटे यांच्या पुतळ्याचे दहन
बुलडाण्यातील या घटनेनंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी मोताळा आणि सिंदखेडराजा येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तर बुलडाण्यात भाजपचे माजी मंत्री संजय कुटे यांच्या पुतळ्याचे दहन केले. त्यामुळे सध्या शहरात वातावरण तणावपूर्ण असल्याचे चित्र आहे.
काय आहे प्रकरण?
आमदार संजय गायकवाड यांनी कोरोनासंदर्भात भाजपा करत असलेल्या राजकारणाविरोधात वक्तव्य केले. त्यावेळी त्यांनी ‘कोरोनाचे जंतू सापडले तर फडणवीसांच्या तोंडात टाकले असते’ असे वक्तव्य केले होते. सोबतच भाजपच्या नेत्यांवर सडकून टीका केली होती. त्यानंतर हे संपूर्ण राजकारण पेटले आहे.