पुणे : पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले त्यानंतर भाजपनिवासी झालेले खासदार संजय काकडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या प्रयत्नाची चर्चा सध्या पुण्यातील राजकीय विश्वात रंगली आहे. मात्र काकडे यांना एका अटीवर घेण्याची गळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी घातल्याने काकडे यांच्यासह काँग्रेसचे वरच्या फळीतील नेतेही पेचात पडल्याचे सांगितले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने प्रत्येक राजकीय पक्षाने उमेदवाराची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातही मुख्य लढत काँग्रेस विरुद्ध भाजप अर्थात आघाडी विरुद्ध (झाल्यास )युती अशी होऊ शकते. त्यातचं राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा काँग्रेसला देण्यास हिरवा कंदील दाखवल्यामुळे काँग्रेसला प्रबळ उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.दुसरीकडे भाजपचे सध्याचे खासदार अनिल शिरोळे किंवा पालकमंत्री गिरीश बापट निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे काकडे यांना संधी मिळण्याची शक्यता आणि त्यातही कार्यकर्त्यांची मदत होणे तितकेसे सोपे नाही. अशा परिस्थितीत काँग्रेस हा एकमेव पर्याय त्यांच्यापुढे शिल्लक आहे.
अशा स्थितीत त्यांनी काँग्रेसकडे चाचपणी केल्यास कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी एक महत्वाची अट घातली आहे. त्यात काकडे यांना काँग्रेसमध्ये घ्यावे, नव्हे त्यांनी लोकसभाही लढवावी मात्र महापालिकेत त्यांच्या काकडे गटाचे असणारे नगरसेवक त्यांनी काँग्रेसमध्ये आणावेत आणि मगच तिकीट घ्यावे असे काँग्रेसमधील एका गटाचे म्हणणे आहे. अर्थात असे झाल्यास काकडे गटातील भाजप नगरसेवक आणि त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नगरसेवक मिळून सत्ता स्थापन करू शकतात. असे झाल्यास भाजपला हा मोठा सर्वात मोठा धक्का ठरणार आहे. मात्र या सगळ्या घटनेसाठी काकडे यांनी नगरसेवक फोडणे आवश्यक आहे. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये येणार का यापेक्षा 'ही' अट पूर्ण करून येणार का अशी चर्चा काँग्रेसच्या वर्धापनदिन कार्यक्रमात रंगली होती.