संजय काकडेंच्या भाजपवापसीने पुण्यात काँग्रेसजन आनंदले : भाजपचे नो कमेंट्स
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 09:35 AM2019-03-23T09:35:01+5:302019-03-23T09:40:02+5:30
राज्यसभेचे खासदार असलेले संजय काकडे यांची गेले काही दिवस धूसर असलेली भूमिका अखेर स्पष्ट झाली असून त्यांच्या भाजपमध्ये राहण्याच्या निर्णयाने पुणे शहर काँग्रेसमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे.
पुणे : राज्यसभेचे खासदार असलेले संजय काकडे यांची गेले काही दिवस धूसर असलेली भूमिका अखेर स्पष्ट झाली असून त्यांच्या भाजपमध्ये राहण्याच्या निर्णयाने पुणे शहर काँग्रेसमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे.
काकडे यांनी मागील काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेत पुणे जागा लढवण्याची तयारी केली होती. त्यांच्या या पवित्र्यामुळे काँग्रेसमधील निष्ठावंत काहीसे निराश झाले होते. त्यातच काकडे यांनी जणू उमेदवारी जाहीर झाली या थाटात वावरण्यास सुरुवात केल्याने काँग्रेसमधील अनेक इच्छुकांनी लढाईआधीच माघार घेतली. मात्र अखेर काँग्रेसच्या श्रेष्ठीनी आधी पक्षात या मग तिकिटाचे बघू अशी भूमिका घेतल्याने त्यांनी भाजपचाच पत्ता कायम ठेवला. इतकेच नव्हे तर शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वतःचे स्थानही पक्के करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून आता तरी बाहेरच्या नव्हे तर आपल्याच (मूळ काँग्रेसच्या) माणसाचाच प्रचार करावा लागणार असल्याचे त्यांना समाधान आहे.
दुसरीकडे काकडे गटाच्या काही समर्थक नगरसेवकांनीही हुश्य केले असून इकडे काकडे तिकडे भाजप अशी अवस्था होण्यापासून तेही वाचले आहेत. शहर भाजपमध्ये मात्र काकडे आहेतच या विचारानेही अनेकांची चिडचिड सुरु झाली आहे. खासदारकीचे तिकीट जरी त्यांना मिळणार नसले तरी त्यांचे स्थान बघता त्यांचा शब्द टाळता येणार नाही याची अनेकांना कल्पना आहे. त्यामुळे काकडे न गेल्याचे काँग्रेसमध्ये आनंद तर भाजपमध्ये 'नो कमेंट्स' म्हणत आहे ते सहन करायचे अशा आविर्भात मंडळी वावरत आहेत.
(ता.क. : काकडे यांना पश्चिम महाराष्ट्राची जबाबदरी मिळाल्यास भाजपमध्येही काहीशी नाराजी पसरणार असून तेथील निष्ठावंतही नाराज होऊ शकतात. )