मुंबईः काँग्रेस पक्षानं मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. काँग्रेसनं संजय निरुपम यांना पायउतार करत त्यांच्या जागी मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद सोपवले आहे. तसेच संजय निरुपम यांनाही नाराज न करता मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री व दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा हे आता मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेणार आहेत. मात्र निरुपम यांच्या उत्तर पश्चिम लोकसभा उमेदवारीला राहुल गांधी यांनी मान्यता दिली आहे.अध्यक्ष म्हणून मनमानी कारभार करणाऱ्या निरुपम यांच्या विरोधात काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष होता. त्यातच मुंबई काँग्रेसच्या गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या कार्यकरिणीत त्यांनी आपल्या 24 समर्थकांची वर्णी लावली होती. तसेच त्यांच्या विरोधात कामत व देवरा गटांनी व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यास देवरा व कामत गटांचा कडाडून विरोध होता. निरुपम यांना येथून तिकीट देऊ नये, अशी भूमिका माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी घेतली होती. त्यातून सुवर्णमध्य काढत काँग्रेसनं मिलिंद देवरांकडेची मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं आहे. तर दुसरीकडे संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
Lok Sabha Election 2019 : संजय निरुपमांना 'उत्तर पश्चिम'ची उमेदवारी, मिलिंद देवरांकडे मुंबई काँग्रेसची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 7:39 PM