पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan suicide) प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात असलेले शिवसेनेचे मंत्री संजय राठोड ( Sanjay Rathod) हे नुकतेच पोहरादेवी मंदिरात पोहोचले आहेत. कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना हजारो समर्थकांनी गर्दी केली असून राठोडांना त्यांनी घेरून मंदिरात नेले. तत्पूर्वी पोहरादेवी पीठाने राठोड यांना महत्वाच्या सूचना केल्या आहेत. (Shivsena minister Sanjay Rathod reach at Poharadevi today.)
पंधरा दिवस गायब असलेले संजय राठोड हे आज पोहरादेवीला पोहोचले आहेत. त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणी पोलीस चौकशीला सामोरे जावे अशा सूचना पोहरादेवी पीठाने दिल्या आहेत. याची माहिती जितेंद्र महाराज यांनी माध्यमांना दिला आहे. जितेंद्र महाराजांनी सांगितले की, जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही, राठोड दोषी आढळत नाहीत तोपर्यंत बंजारा समाज त्यांना दोषी धरणार नाही. आम्ही त्यांना या प्रकरणी चौकशीला सामोरे जाण्यास सांगू. न्यायालयीन प्रक्रियेतून जाण्यास सांगू.
पूजा चव्हाण ही समाजाचीच मुलगी आहे. तिला दोनवेळा पीठावरून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. या प्रकरणाचे राजकारण करू नका. तिच्या पालकांनीच पूजाने आत्महत्या का केलीय ते सांगितले आहे. संजय राऊत यावर आज बोलतील. तसेच ते केवळ दर्शनासाठी आले आहेत, असेही जितेंद्र महाराजांनी सांगितले.
संजय राठोड यांनी पोहरादेवी म्हणजेच जगदंबा देवीचे दर्शन घेतले असून थोड्याच वेळात ते या प्रकरणी बोलण्याची शक्यता आहे.
वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेल्या संत सेवालाल महाराज, आई जगदंबामाता आणि राष्ट्रीय संत डॉ. रामराव महाराज यांच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येथे हजेरी लावतात.
कोण आहे पूजा चव्हाण?
पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.