लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा देऊन चार दिवस लोटले तरी अद्याप हा राजीनामा राज्यपालांकडे पाठविण्यात आलेला नाही.
विधिमंडळ अधिवेशनाच्या एक दिवस आधी म्हणजे २८ फेब्रुवारीला राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्येबाबत झालेल्याआरोपांच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ते सपत्नीक गेले होते आणि त्यांनी राजीनाम्याचे पत्र दिले होते. हा राजीनामा आपण स्वीकारला असल्याची माहिती त्याच दिवशी सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना दिली होती.
राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही अशी घोषणा विरोधी पक्ष भाजपने केलेली होती. राठोड यांच्या राजीनाम्यामुळे अधिवेशनाचे कामकाज सोमवारपासून सुरळीत झाले. मात्र, राठोड हे कागदोपत्री अजूनही मंत्री आहेत. कारण, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा राजभवनकडे अद्याप पाठविलेला नाही. मुख्यमंत्री हा राजीनामा राज्यपालांकडे पाठविणार की नाही या बाबत उत्सुकता आहे.
राष्ट्रपती राजवटीवरून विधानसभेत खडाजंगीराज्यात आई-बहिणी सुरक्षित नाहीत. जळगावच्या घटनेत मुलींना नग्न करून नाचविले गेले. अशी गंभीर घटना घडूनही पोलीस माहिती देणार नसतील तर राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागेल, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी देताच विधानसभेत खडाजंगी झाली.मुनगंटीवार हे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी देत आहेत. हे बहुमताचे सरकार आहे. राजकीय उद्देशाने अशा धमक्या दिल्या जात आहेत, असा हल्लाबोल अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला आणि मुनगंटीवार यांचे विधान कामकाजातून काढण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर, तपासून हे विधान काढले जाईल, असे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केले.
‘त्या’ महिला पोलिस अधिकाऱ्यांची बदलीरत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची जिल्ह्याबाहेर बदली करून चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये कोरोना प्रतिबंधक नियम डावलून विविध कार्यक्रमांना परवानगी देणाऱ्या आणि राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंगळवारी सभागृहात केली होती.