मुंबई: देशातील पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये गोवा राज्याचाही समावेश असून, गोव्यात १४ फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान (Goa Election 2022) होणार आहे. गोव्यात एकाच टप्प्यात मतदान होणार असून, १० मार्च रोजी अन्य राज्यांबरोबर मतमोजणी होणार आहे. यातच महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडी अस्तित्वात येण्यासाठी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) प्रयत्नशील आहेत. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांना, उत्पल मनोहर पर्रिकर यांना शिवसेना तिकीट देणार का, असा प्रश्न विचारण्यात आला.
गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढतायत. काँग्रेसलाही सोबत घेण्यास संजय राऊत प्रयत्न करीत आहेत. मात्र, काँग्रेसकडून अद्याप प्रतिसाद देण्यात आला नसल्याचे सांगितले जात आहेत. दादरा नगर हवेलीमध्ये आम्ही लोकसभेची निवडणूक जिंकलो. दिवंगत मोहन डेलकर यांचे कुटुंब शिवसेनेत आले आणि आम्ही संपूर्ण ताकद पणाला लावली. जर पर्रिकरांच्या कुटुंबाने हिंदुत्ववादी म्हणून शिवसेनेसोबत संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच शिवसेना त्यांच्यासाठी ताकद पणाला लावेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
उत्पल पर्रिकर यांनी हिंमत दाखवायला हवी
उत्पल पर्रिकर यांनी हिंमत दाखवायला हवी. त्यांच्या वडिलांनी गोव्यात भारतीय जनता पक्षाला एक स्थान निर्माण करुन दिले. त्यांच्या वडिलांनी भारतीय जनता पक्ष गोव्यात रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच प्रतिमेवर भारतीय जनता पक्ष टिकला आहे. नाही तर तो गोव्यात आयाराम गयारामवरच होता. त्यामुळे हे उत्पल पर्रिकरांवर अवलंबून आहे की, त्यांनी काय करावे. शेवटी राजकारणात काही निर्णय हिंमतीने, धाडसाने घ्यायला लागतात. शिवसेना हा एक हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाला पर्याय म्हणून लोक शिवसेनेचा भविष्यात विचार करतील असे मला वाटते, असेही ते म्हणाले.
गोव्यात हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेना रहाते की भाजप?
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे जमिनीच्या वर चार हात चालतायत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ते म्हणतात की, गोव्यात शिवसेनेला काय महत्व आहे, भारतीय जनता पक्षाला तरी कधी काळी लोक विचारायचे का गोव्यात? पण येणारा काळ ठरवले गोव्यात हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेना राहते की भाजप, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, गोव्यामध्ये महाविकास आघाडीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही मनापासून प्रयत्न केले पण काँग्रेसच्या मनामध्ये आहे की, ते गोव्यामध्ये स्वबाळावर सत्ता आणू शकतात. त्यांनी तसे संकेत दिल्लीत दिले असतील त्यामुळे ते मागेपुढे करत आहेत. काँग्रेसने आम्हाला काही जागा दिल्या आहेत पण आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत पण शिवसेना निवडणुका लढणार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.