मुंबई: कोकणासह, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात झालेल्या अतिवृष्टीचा फटका हजारो कुटुंबाना बसला आहे. दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी महाड येथील तिळये गावातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौऱ्यावर गेले होते. मात्र, भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाचे स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याबाबत भाजपने महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली असून, राज्यात आलेल्या पुरात राज्यघटनेचे पुस्तक वाहून गेले काय, अशी खोचक विचारणा केली. (sanjay raut criticizes governor bhagat singh koshyari over konkan floods visit)
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी कोकणातील पूरस्थितीची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. महाडनंतर चिपळूण येथील बाजारपेठेला भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात निलंबित झालेले आमदार आशीष शेलार होते. यावरून शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. ते मीडियाशी बोलत होते.
“जनता राग व्यक्त करू लागल्याने शिवसेना हादरलीय, लोकहिताशी संबंध नाही, हे सिद्ध झालंय”
राज्यपाल पुस्तक चाळूनच काम करत असतात
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच राज्यघटनेचे पुस्तक चाळून काम करत असतात. मात्र, त्याचे राज्यघटनेते पुस्तक या पुरात वाहून गेले की काय हे पाहावे लागेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली. राज्यटघटनेनुसार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काही आमदारांचे निलंबन झाले आहे. विधिमंडळात आमदारांनी घातलेला गोंधळ आणि केलेली दंगल, तसेच त्यांचे राजदंडाला हात घालणे हे वर्तन घटनाबाह्यच होते आणि म्हणूनच विधानसभा अध्यक्षांनी त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ राज्यपाल कोश्यारी हे विधानसभेचे अधिकार मानायला तयार नाहीत, असे दिसत आहे. विधानसभेचे अस्तित्व आणि राज्यघटनेने दिलेले अधिकार जर राज्यपाल मानतच नसतील, तर आता या संदर्भात सरकार काय करते हे पाहावे लागेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
“CM उद्धव ठाकरे जनतेला आपलेसे वाटणारे नेतृत्व, भविष्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावी”
दरम्यान, राज्यपाल भतगसिंह कोश्यारी यांना जास्त कळते असे मी मानतो, असे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, त्याप्रमाणे निलंबित आमदारांना घेऊन राज्यपाल दौऱ्यावर गेलेले आहेत. आता ते नक्कीच जास्तीत जास्त मदत आणतील असेच आम्ही मानतो, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला.