महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन बेळगाव सोडा मुंबई देखील कर्नाटकचा भाग आहे, असं विधान करणाऱ्या कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी झापलं आहे. "असे येडे बरळत असतात. त्यांनी जरा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नाचा अभ्यास करावा", असा टोला संजय राऊत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना लगावला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
"काल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली बैठक ही निर्णायक बैठक होती. त्यामुळे कोणी काही बरळलं तरी आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही, बेळगाव महाराष्ट्रात आलाच पाहिजे ही आमची मागणी आहे. राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत हे कर्नाटक सरकारने लक्षात घ्यावं", असा इशारा संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.
सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकचेच - लक्ष्मण सवदी
महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादावर बोलत असताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचाच भाग असल्याचं वक्तव्य केलं होतं. बेळगाव हे अखंड कर्नाटकाचा अभिवाज्य अंग असून महाराष्ट्रातील नेते कितीही ओरड करत असले तरी चंद्र-सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहणार, असं सवदी म्हणाले होते. सवदी यांच्या विधानाचा संजय राऊत यांनी आज समाचार घेतला.
"दोन राज्यांच्या सीमेचा हा प्रश्न आहे. त्यामुळे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी जरा इतिहास समजून घेतला पाहिजे. मुंबईतील कानडींवर आम्ही कोणती सक्ती केलेली नाही. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. त्यांच्या शाळाही आम्ही इथे चालवतो. त्यांच्या संस्थाही महाराष्ट्रात चालतात. तशी परिस्थिती बेळगावमध्ये आहे का? बेळगावमध्ये मराठीचं काय स्थान आहे?", असे सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले. आम्ही फक्त कर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात यावा असं सांगत आहोत. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकदा महाराष्ट्रात यावं आणि इथल्या कानडी लोकांशी बोलावं, असंही संजय राऊत म्हणाले.
अजेंड्याबाबत आम्हाला कुणी शिकवू नयेउद्धव ठाकरे स्वत:चा अजेंडा राबवत असल्याच्या विरोधकांच्या टीकेलाही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. "शिवसेनेनं आपला अजेंडा राबवला तर चुकलं कुठं? देशात सहा वर्षांपासून ज्यांची सत्ता आहे ते कुणाचा अजेंडा राबवत आहेत? कशा प्रकारे राबवत आहेत? त्यामुळे आम्ही काय अजेंडा राबवावा हे आम्हाला कुणी शिकवू नये, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या हिताचाच अजेंडा राबवत आहेत", असं संजय राऊत म्हणाले.