मुंबई - महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
पुण्यात संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले, राज्यपालांनी राजभवनात निवांत राहावं, त्यांची नेमणूक केंद्राकडून होत, पण राज्याच्या तिजोरीतून राज्यपालांवर खर्च केला जातो. राज्यपालांना राजकारण करायचं असेल तर राजभवनाच्या बाहेर या, मैदानात येऊन राजकारण करा, घटनात्मक पदाचा सन्मान राखतो ही आमची भूमिका आहे. वीजबिलासाठी कोणी राष्ट्रपतींकडे गेले नव्हते, २ जी घोटाळ्यात मंत्र्यांची नावे आली होती, म्हणून राष्ट्रपतींकडे गेलो होतो. शरद पवार आमचे नेते आहेत, राज्यपाल शरद पवारांना नेता मानतात त्याचे स्वागत करतो, पण राज्यपालांनी त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांना पंतप्रधान, राष्ट्रपतींकडे पाठवायला हवे. राज्यपालांना शरद पवारांचे मार्गदर्शन हवं असेल तर मी पवारसाहेबांना विनंती करेन की तुम्ही राज्यपालांना मार्गदर्शन करा, राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनू नये अशी टीकाही संजय राऊतांनी राज्यपालांवर केली.
तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुणे आहे, बाळासाहेब ठाकरे असताना ते मुंबईत होतं, मात्र आता सगळे प्रमुख नेते पुण्यात आहे. सरकारला १ वर्ष होणार नाही असं काही लोकांना वाटत होतं, परंतु हे होणारच होतं असं मला नेहमी वाटत होतं, सरकार कोसळण्याचा कालावधी देत होते, पण आता सरकारला १ वर्ष पूर्ण होतंय, महाविकास आघाडी सरकार पूर्ण ताकदीनं चालेल, मधला काळ संकटात गेला. संपूर्ण लढाई उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात चांगल्यारितीने लढली गेली. मुख्यमंत्र्यांनी आरोग्यविषयक संकट राज्यावर आले त्याचं नेतृत्व स्वत: केलं, त्यामुळे हानी कमी झाली नाहीतर अराजकता दिसली असती असंही संजय राऊत म्हणाले.
त्याचसोबत महाराष्ट्रात तीन पक्षाचं सरकार असताना अनेक आव्हानं आहे, त्यातच विरोधकांकडून आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, राज्यात मजबूत विरोधी पक्ष आहे. पण ते सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभं करण्यापेक्षा ते राज्यापुढे आव्हान उभं करतात, संसदीय लोकशाहीत उत्तम विरोधी पक्ष असायला हवा, त्याशिवाय देश पुढे जात नाही. महाराष्ट्राची परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार असतील किंवा अन्य नेते प्रत्येकाने विरोधी पक्षाच्या नेत्यांचे स्वागत केले आहे. मात्र दुर्देवाने जे आपल्या विचारांचे नाहीत, त्यांना राजकारणात राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका अलीकडे तयार होतेय हे देशासाठी आणि राज्यासाठी घातक आहे. आम्ही राजकीय दहशतवादाला विरोध करत असू तर सगळ्यांनी एकत्र उभं राहणं गरजेचे आहे अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपाला फटकारलं आहे.
शरद पवारांचा सल्ला घेतल्यानं कोणाच्या पोटात दुखू नये
एकापेक्षा जास्त पक्ष येऊन सरकार येतं, तेव्हा त्या आघाडीतला प्रमुख नेता जो आहे त्यांचा सल्ला घेतला जातो, युती सरकार असताना बाळासाहेब ठाकरे यांचा सल्ला घेतला जात होता, शरद पवारांनी सल्ला दिला म्हणून कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही, नरेंद्र मोदीही शरद पवारांचा सल्ला घेतात, शरद पवार देशातील सगळ्यात अनुभवी, संयमी नेते आहेत, ते आपल्या महाराष्ट्राच्या मातीतले आहेत, त्यांच्याकडून सल्ला घेतला नाही, तर आमच्यासारखे दुर्दैवी आणि करंटे आम्हीच आहोत असं संजय राऊत म्हणाले.
...तर राज्याच्या ऐक्यासाठी धोकादायक
मराठा आरक्षणाचं राजकारण कोणी करत असेल तर राज्यासाठी घातक आहे. राज्य एकजूट आहे म्हणून महाराष्ट्र आहे, राजकारणासाठी याचा गैरफायदा काहीजण घेऊन सामाजिक एकोपा बिघडवू नये, राज्याच्या ऐक्याला धक्का पोहचवत आहे, भाजपा नेत्यांनी पंतप्रधानांकडे जाऊन आरक्षणाचा मुद्दा सोडवू शकता, त्याचे श्रेय तुम्ही घ्या, सगळेजण आम्ही एकत्र येऊ, कायदेशीर बाबी आणि न्यायलयीन बाबीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत आहेत असं अप्रत्यक्षरित्या राऊतांनी भाजपावर निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीस यांचे भविष्य उज्ज्वल
विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्र्यांमध्ये संवाद असायला हवा, पण कुठेतरी हा संवाद थांबला आहे, हे राज्य आमचं आहे अशी भावना विरोधकांची असायला हवी, सत्ता गेली तर राज्याची दुश्मनी करता येणार नाही, सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा अधिकार विरोधकांना आहे. पण राज्याच्या बेईमानी करू नका, देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय अनुभव वाढत चालला आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊ आलं नाही, ध्यानीमनी नसताना सत्ता गेली त्याचा धक्का अजून पचवू शकले नाहीत. त्यातून देवेंद्र फडणवीसांनी बाहेर पडावं भविष्य उज्ज्वल आहे असा चिमटा संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना काढला आहे.
शिवसेनेला कोणीही हिंदुत्व शिकवू नये
आमचं हिंदुत्व राजकीय नाही, घंटा बडवली अने शेंडी ठेवली म्हणजे हिंदुत्व नाही. शिवसेनेची चळवळ मराठी माणसाची जोडली आहे. आम्ही राजकारणात पदं मिळावी म्हणून आलो नाही, ही चळवळ वाढली पाहिजे, महाराष्ट्राच्या गावागावात पोहचली पाहिजे यासाठी आम्ही काम केले. शिवसेनेला कोणी हिंदुत्व शिकवू नये, आजही आक्रमकपणे आम्ही हिंदुत्व मांडतो, एक वर्षापूर्वी आमच्या हिंदुत्वावर भाजपला शंका नव्हती, राजकारणात जे ठरवून येतात ते कधी टिकत नाही, विचारांशी प्रामाणिक राहा, विचार बदलल्याने काही साध्य नाही. बाळासाहेब ठाकरे कसे निर्माण झाले हे नव्या पिढीला कळावं म्हणून ठाकरे सिनेमा काढला, सत्ता येण्यासाठी ज्यांनी हातभार लावला त्यांच्याविषयी शिवसैनिकांच्या मनात कटुता नाही, आता सगळेच मूळ शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरे नेहमी विरोधकांचे ऐकायचे, त्यांच्यासोबत चर्चा करायचे, हीच परंपरा महाराष्ट्राची आहे, काँग्रेस असो शरद पवार असो सगळ्यांनी ही परंपरा कायम राखली आहे, संवाद राखणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे, राजकारणासाठी आम्ही हिंदुत्वाचा वापर केला नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन चाललो असं संजय राऊत म्हणाले.