Maharashtra Breaking News: खासदार संजय राऊतांनीमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला. राज ठाकरे सामना कार्यालयात बसायचे तेव्हा संजय राऊत मागे-पुढे लाळ घोटायचे, अशा शब्दात अमेय खोपकर यांनी सुनावले असून, उद्धव ठाकरेंनाही राऊतांना आवरण्याचा इशारा दिला आहे.
"जर खरोखर या राज्यातील नेत्यांना सुसंस्कृत राज्य परत बनवायचे असेल, तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची चाटूगिरी बंद केली पाहिजे", अशा भाषेत खासदार संजय राऊतांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली. या टीकेला आता अमेय खोपकर यांनी उत्तर दिले.
अमेय खोपकर संजय राऊतांबद्दल काय म्हणाले?
मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "आज सकाळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना एक सकाळचा भोंगा, जो रोज सकाळी वाजतो. त्यांनी राज ठाकरे साहेबांवर खालच्या पातळीवर टीका केली."
"मला असं वाटतं की, ज्याला आपल्या गल्लीमध्ये कुत्र्याची किंमत नाही... कुत्र्याचा अपमान आहे हा... कसली किंमत नाही. त्याने राज ठाकरेंवर टीका करू नये. तुमची तेवढी पात्रता नाही. तुम्ही स्वतःला देशपातळीवरील राजकारणी समजत असाल, पण तुम्ही नाही", अशी टीका खोपकर यांनी संजय राऊतांवर केली.
अमेय खोपकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा
"मी तुमच्या (संजय राऊत) पक्षप्रमुखांना हे सांगू इच्छितो की, या संजय राऊतांना ताकीद द्या. त्यांची जरा समजूत घाला. नाहीतर महाराष्ट्र सैनिकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल. राज ठाकरे ज्यावेळी सामना कार्यालयात बसायचे. त्यावेळी राज साहेबांच्या मागे-पुढे लाळ घोटत फिरणारा संजय राऊत... आज शिंग फुटली का?", अशा शब्दात खोपकरांनी सुनावलं आहे.
"शिंग फुटल्यानंतर तुम्ही राज साहेबांवर टीका करता खालच्या पातळीवरची. काय लायकी आहे संजय राऊतांची की, तुम्ही राज साहेबांवर टीका करत आहात? महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो काही गलिच्छ चिखल केलाय, तो तुमचा तुम्ही निस्तरा. तुमचं काय करायचं, ते करा. आम्ही आमच्या पक्षाचा प्रचार करतोय", अशा शब्दात खोपकर यांनी संजय राऊतांच्या टीकेला उत्तर दिले.
ते पुढे म्हणाले, "राज ठाकरे साहेब महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी, महाराष्ट्र नवनिर्माणासाठी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार विजयी करण्यासाठी राज साहेब मेहनत करत आहेत. आमचे महाराष्ट्र सैनिक मेहनत करत आहेत. संजय राऊतांनी आमच्या नादाला लागायचं नाही. मी सक्त ताकीद देऊन ठेवतोय. याला तुम्ही इशारा समजा. किंवा धमकी समजा. यापुढे राज साहेबांवर टीका केलेली सहन करणार नाही. संजय राऊत हे परत परत होतंय. तुमची पात्रता सांभाळा आणि बोला. तोंडाला लगाम द्या. इतर पक्षाचे लोक गप्प बसत असतील, महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही. लायकीत राहायचं."